Kunal Kamra Eknath Shinde Controversy : कॉमेडियन कुणाल कामरा हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल व्यंगात्मक गीत गायल्यानंतर अडचणीत सापडला आहे. या प्रकरणात कामरा याला अटक करावे अशी मागणी शिवसेना पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते करत आहेत. यादरम्यान कुणाल कामरा याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कारण एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बदनामी करणारे वक्तव्य केल्या प्रकरणात कामरा याच्याविरोधात महाराष्ट्रात आणखी तीन एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत.

हे नवीन गुन्हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी दाखल करण्यात आले आहेत. शुक्रावारी या तक्रारी पुढील तपासासाठी खार पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आल्या आहेत अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची खार पोलीसांकडून आधीपासून चौकशी केली जात आहेत. खार पोलिसांनी कामरा याला चौकशीसाठी हजर राहाण्याकरिता दोन समन्स देखील बजावले आहेत. कामराने त्याला एक आठवड्याची मुदत दिली जावी अशी विनंती केली होती मात्र पोलिसांनी त्याची विनंती फेटाळून लावली होती.

शुक्रवारी कामरा याला मद्रास उच्च न्यायालयाने सात एप्रिल पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून कामरा याच्याविरुद्ध पहिला एफआयआर दाखल करण्यात आला होता .

तीन नवीन एफआयआर देखील शिवसेना कार्यकर्त्यांनी दाखल केल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे मयूर बोरसे यांनी तर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे संजय भुजबळ आणि नाशिकच्या नांदगाव मनमाड येथे सुनील जाधव यांनी एफआयआर दाखल केला आहे.

नवीन एफआयआर भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये ३५३(१)(ब), ३५३(२) आणि ३५६(२) यांचा समावेश आहे असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान कामरा याला मद्रास उच्च न्यायालयाकडून पहिल्या प्रकरणात दिलासा मिळाला असला तरू मुंबई पोलीस लवकरच नवीन प्रकरणात नवीन समन्स पाठवू शकतात.

नेमकं प्रकरण काय आहे?

कुणाल कामरा याने फेब्रुवारीमध्ये खार येथील हॉटेल युनिकाँटीनेंटलमध्ये हॅबिटॅट स्टुडिओमध्ये सादर केलेल्या ‘नया भारत’ या स्टँडअप कॉमेडी शो केला होता. याचा व्हिडीओ गेल्या शनिवारी यूट्यूबवर अपलोड करण्यात आला.

कुणाल कामराने शेअर केलेली ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांना शो रेकॉर्ड केला गेला त्या स्टुडिओची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी शिवसेना कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आणि १२ जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले.