प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एका विडंबनात्मक कवितेतून टीका केली होती. या कवितेवरून शिवसेना (शिंदे) आक्रमक झाली आहे. कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी खारच्या (मुंबई) युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये जाऊन तोडफोड केली आहे. याच हॉटेलमध्ये कुणाल कामरा याचा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात त्याने एकनाथ शिंदेंबद्दल कविता सादर केली होती.

या तोडफोडप्रकरणी खार पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचे सरचिटणीस राहुल कनाल आणि वांद्रे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतलं होतं. पाठोपाठ आणखी १८ जणांना जणांना ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, यापैकी राहुल कनालसह अनेकांना पोलिसांनी चौकशी करून सोडून दिलं होतं. दरम्यान, या तोडफोड प्रकरणात दुपारी १२ जणांना अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

पोलिसांनी शिवसेनेच्या (शिंदे) १२ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यामध्ये राहुल कनाल यांचाही समावेश आहे. राहुल कनाल यांच्यासह इतर ११ जणांना काही वेळापूर्वी वांद्रे न्यायालयासमोर हजर केलं. वांद्रे पोलिसांनी राहुल कनाल, कुणाल सरमळकर, अक्षय पनवेलकर, गोविंद पाडी, राहुल तुर्बडकर, विलास चावरी, अमीन शेख, समीर महापदी, हिमांशू, शशांक कोडे, संदीप मळप, गणेश राणे, शोभा पालवे, कृष्णा ठाकूर, पवनज्योत सेठी, कल्पेश, कुरेशी हुजेफ आणि चांद शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच इतर १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

शिवसैनिक कुणाल कामराविरोधात आक्रमक

कुणाल कामराने त्याच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ युट्यूबवर शेअर केल्यानंतर तो व्हायरल झाला. त्यामधील एकनाथ शिंदेंवरील कविता ऐकून शिवसैनिक (शिंदे) संतापले आणि त्यांनी रविवारी रात्री खार येथील द युनिकॉन्टिनेंटल मुंबई या हॉटेलवर हल्ला केला. हॉटेलमधील स्टुडिओची तोडफोड केली. कुणाल कामराने युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये कार्यक्रम घेतला होता. या क्लबमध्ये जाऊन एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी धुडगूस घातला. या क्लबमधील खुर्च्यांची आणि संपूर्ण सेटची तोडफोड केली. बल्ब व ट्युबलाइट्स फोडल्या. पाठोपाठ ठाण्यातही शिवसेनेच्या समर्थकांनी जोरदार निर्देशने केली. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याबाहेरही शिवसैनिकांनी कुणाल कामराची छायाचित्रे जाळली.