Kunal Kamra : स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन करणारं गाणं म्हणताना दिसतो आहे. या गाण्यात त्याने एकनाथ शिंदेंचा उल्लेख गद्दार असा केला आहे. हा व्हिडिओ संजय राऊत यांनी पोस्ट केला आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.
काय आहे हे प्रकरण?
कॉमेडियन कुणाल कामराने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने एक गाणं म्हटलं आहे. या गाण्यात त्याने एकनाथ शिंदेंचं नाव घेतलेलं नाही. मात्र हे विडंबनात्मक गाणं एकनाथ शिंदेंच्या विरोधातलं आहे हे स्पष्ट कळतं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कुणाल कामरा काय म्हणतो?
“महाराष्ट्र इलेक्शन में इन्होने जो किया है बोलना पडेगा. यहांपे पहले इन्होने क्या किया? शिवसेना बीजेपीसे बाहर आ गयी. उसके बाद शिवसेना शिवसेनासे बाहर आ गयी, एनसीपी एनसीपी बाहर आ गयी. एक व्होटर को नौ बटन दे दिये. सब कन्फ्युज हो गये. चालू एक जन ने किया था. वो मुंबईमें एक बहोत बढिया डिस्ट्रिक्ट है थाने. वहाँ से आते है..” असं कुणाल कामरा म्हणतो आणि गाणं सुरु करतो. या गाण्याला ‘भोली सी सुरत’ या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील गाण्याची चाल आहे. या चालीवर तो म्हणतो ‘मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आये’. हा कुणाल कामराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
खासदार संजय राऊत यांनी पोस्ट केला व्हिडीओ
कुणाल कामराचा हा व्हिडीओ खासदार संजय राऊत यांनीही पोस्ट केला आहे. कुणाल की कमाल! जय महाराष्ट्र! असं म्हणत हा व्हिडीओ संजय राऊत यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओवरुन आता वाद ओढवण्याची शक्यता आहे.
कुणाल कामराने घेतलं नाही एकनाथ शिंदेंचं नाव पण…
कॉमेडियन कुणाल कामराने संपूर्ण व्हिडीओमध्ये किंवा गाण्यात एकनाथ शिंदे यांचं नाव कुठेच घेतलेलं नाही. मात्र जे गाणं म्हटलं आहे आणि त्यात जे वर्णन केलं आहे त्यावरुन कुणाल कामरा एकनाथ शिंदेंबाबतच बोलतो आहे हे स्पष्ट होतं आहे. त्यामुळे आता कुणाल कामराच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. एकनाथ शिंदेंनी २०२२ मध्ये बंड करत थेट चाळीस आमदारांना घेऊन शिवसेना सोडली होती. त्यानंतर ते भाजपासह गेले. भाजपाशी हातमिळवणी करुन ते मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं होतं. २०२४ मध्ये जेव्हा विधानसभा निवडणूक झाली तेव्हा महायुतीला २८८ पैकी २३७ जागा मिळाल्या. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd