Kunal Kamra’s Show : प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने एक विडंबनात्मक गाणं बनवून एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. यावरून आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला त्या हॉटेलची तोडफोड केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं.

शोमधील व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे शिंदे यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी रविवारी रात्री खार येथील द युनिकॉन्टिनेंटल मुंबई हॉटेलवर हल्ला केला आणि तोडफोड केली. तसंच, या समर्थकांनी कुणाल कामराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्याला थेट धमकीही दिली आहे. कामराविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यासाठी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते विविध पोलिस ठाण्याबाहेर जमले.

खुर्च्या फेकल्या अन् लाईट्ही फोडल्या

कुणाल कामराने खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये शो घेतला होता. या क्लबमध्ये जाऊन एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी धुडगूस घातला. या क्लबमधील खुर्च्यांची आणि संपूर्ण सेटची तोडफोड करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच खिल्ली उडवल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. त्यामुळे शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही शिवसेनेच्या समर्थकांनी जोरदार निर्देशने केली. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याबाहेरही शिवसैनिकांनी कुणाल कामराचे फोटो जाळले.

दरम्यान, याप्रकरणी आता युवासेनेचे सचिव राहूल कनाल आणि १९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध कलमांखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तर राहुल कनाल यांनीही कुणाल कामराविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसंच, आमदार मुराजी पटेल यांच्या तक्रारीनुसार अंधेरी पोलीस ठाण्यात कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.