Kurla BEST Bus Accident News : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी पोलिसांनी बसमधील सीसीटीव्ही कॅमेरेचा डिव्हीआर जप्त केला आहे. त्यातील चित्रिकरणाच्या आधारे अपघातग्रस्त बसमधून प्रवास करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदविण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. याप्रकरणी आतापर्यंत २५ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले असून त्यात प्रवासी, प्रत्यक्षदर्शी, जखमी, बेस्ट कर्मचारी व परिवहन अधिकारी यांचा समावेश आहे. याप्रकरणी आणखी व्यक्तींचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.दरम्यान, चालक बसमधून बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर कुर्ला पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवणे सुरू केले आहे. दरम्यान पोलिसांनी अपघातग्रस्त बसमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेचा डिव्हीआर ताब्यात घेतला आहे. सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या मदतीने अपघातग्रस्त बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती काढून त्यांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. अपघातग्रस्त बसमधून प्रवास करणारे प्रवासी हे प्रत्यक्षदर्शी असून त्यांचा जबाब महत्त्वाचा ठरणार आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. तर, बेस्ट बसच्या तुटलेल्या खिडकीतून चालक बाहेर पडत असल्याचाही एक व्हिडिओ समोर आला आहे.

अपघातानंतर चालकावर संशयाची सुई आहे. त्याला अटक करण्यात आली २१ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. चालकाने मद्यपान केल्याने संबंधित प्रकार घडल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे. तर, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओनुसार, अपघात घडल्यानंतर अनेक प्रवासी बसमधून खाली उतरले. त्यानंतर चालक आणि वाहक दोघेही बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. अपघातामुळे गाडीच्या खिडकीच्या काचा फुटल्या होत्या. या तुटलेल्या खिडकीतूनच चालक आणि वाहक यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. बसमधील सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे.

u

आतापर्यंत काय घडलं?

बसवरील चालकाचे नियंत्रण कशामुळे सुटले याबाबत सर्वबाजूंनी तपास सुरू आहे. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांचा मृत्यू व ४० जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची स्थिती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी चालक १ डिसेंबरपासून इलेक्ट्रीक बस चालवत होता. त्यापूर्वी त्याला इलेक्ट्रीक बस चालवण्याचा अनुभव नव्हता. त्यासाठी त्याने अत्यल्प प्रशिक्षण घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान, कंपनीने दिलेल्या माहितीनुसा चालकाने १० दिवसांचे इलेक्ट्रीक बस चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. या दाव्याची पडताळणी पोलीस करणार आहेत.

हेही वाचा >> कुर्ला बस अपघात: मृत महिलेचे दागिने चोरणाऱ्याविरोधात अखेर गुन्हा दाखल

आरोपी चालक ३३२ क्रमांकाची बस चालवत होता. ती बस कुर्ला ते अंधेरी मार्गावर चालते. अपघातापूर्वी त्याने तीन फेऱ्या पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर हा गंभीर अपघात घडला. आरोपी चालकाने १ ते ९ डिसेंबर या कालावधीत कोणत्या मार्गावर बस चालवल्या, याबाबतचीही माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी चालकाला याप्रकरणी ११ दिवसांंची पोलीस कोठडी सुनावली असून याप्रकरणी कुर्ला पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपी बसवरील ताबा सुटल्यामुळे अपघात झाल्याचे चौकशीत सांगितले आहे. पोलीस त्याबाबत अधिक तपास करत आहेत. याशिवाय आरोपी चालकाच्या मानसिक स्थितीची तपासणीही करण्यात येणार आहे. याशिवाय बसचीही परिवहन विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kurla bus accident news in marathi bus driver sanjay more escape video viral sgk