वाचन संस्कृती लोप पावत असल्याचा सूर सातत्याने आळवला जात असला तरी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या वाचकांना अभिरुचीसंपन्न साहित्याचा आस्वाद देणाऱ्या उपक्रमाने आता देशाची सीमा ओलांडत थेट परदेशात भरारी घेतली आहे. दुबई येथे हा उपक्रम सुरू झाला असून लवकरच तो अमेरिकेतील टेक्सास येथील मराठी वाचकांच्या सेवेत रुजू होत आहे.
वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत असल्याचे सांगत काहींनी राज्य शासन, साहित्य मंडळाला काय करता येईल यावर उपाय सुचविण्यास सुरुवात केली आहे. या कोलाहलात कुसुमाग्रज प्रतिष्ठानने ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमाद्वारे वाचन संस्कृती जोपासण्याची धडपड चालविली आहे. या उपक्रमाची संकल्पना मांडून त्याची धूरा विनायक रानडे नेटाने सांभाळत आहे. पाच वर्षांपूर्वी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमास नाशिकमधून ११ ग्रंथपेटय़ांनी सुरुवात झाली. वाढदिवसाच्या दिवशी एका पुस्तकासाठी २०० रुपये देणगी स्वरुपात घ्यायचे आणि त्यातून पुस्तकांची खरेदी करून जमा होणारी पुस्तके वाचकांना नि:शुल्क उपलब्ध करायची, अशी रुपरेषा आहे. ग्रंथ सुटे हातात देण्यापेक्षा ते योग्य पध्दतीने वाचकांपर्यंत जावे यासाठी ‘पेटी’चा वापर झाला. या पेटीत कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, पाककला, कविता, नाटय़, विज्ञान यासह अन्य प्रकारांचा पुस्तकांचा समावेश केला जातो. आज प्रतिष्ठानकडे ४९५ ग्रंथ पेटय़ा असून त्यात ४९,५०० ग्रंथ आहेत.
प्रत्येक व्यक्तीची जन्म तारीख रानडे नोंद करून ठेवतात. त्या दिवशी संबंधिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांनाच पुस्तकांसाठी देणगी हक्काने मागितली जाते. ३५ वाचक ज्या ठिकाणी एकत्र येत असतील, त्यांनी मागणी केली की ग्रंथाची पेटी त्यांना सुपूर्द केली जाते. त्यासाठी एका समन्वयकाची नेमणूक होते. नि:शुल्क तत्वावर चालणाऱ्या उपक्रमात सारेजण स्वयंस्फुर्तीने काम करत आहेत. या माध्यमातून आज एक लाखाहून अधिक वाचकांशी नाळ जोडली गेली.
राज्यातील आदिवासी पाडे, कारागृह, रुग्णालय, शाळा, सहकारी वित्त संस्था आदी ठिकाणी हा उपक्रम सुरू आहे. दिल्ली, बंगलोर, कर्नाटकसह अन्य भागातील काही नवीन ठिकाणी तो सुरू करण्याचा दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. प्रतिष्ठानची ग्रंथ पेटी दुबईला पोहोचली आहे. टेक्सास येथे हा उपक्रम सुरू करण्याविषयी तेथील काही मराठी नागरिकांशी चर्चा करण्यात आल्याचे रानडे यांनी सांगितले.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ग्रंथ वाचन उपक्रम आता अमेरिकेच्या दारी
वाचन संस्कृती लोप पावत असल्याचा सूर सातत्याने आळवला जात असला तरी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या वाचकांना अभिरुचीसंपन्न साहित्याचा आस्वाद देणाऱ्या उपक्रमाने आता देशाची सीमा ओलांडत थेट परदेशात भरारी घेतली आहे.
आणखी वाचा
First published on: 06-07-2014 at 02:19 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kusumagraj pratishthan book reading project in us