राज्यातील शेतकऱ्यांच्या गायी व म्हशीचे दुग्धोत्पादन वाढण्यासाठी उच्च वंशावळीच्या वळूंचे गोठीत वीर्यमात्रा पुरवण्यासाठी अद्ययावत गोठीत रेतमात्रा उत्पादन प्रयोगशाळेची स्थापना राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात होणार आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाबरोबर याबाबत विद्यापीठाचा सामंजस्य करार नुकताच झाला.
सामंजस्य कराराच्या वेळी कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे, मुंबई येथील राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे व्यवस्थापक डॉ. एम. एच. बूच, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळातील दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सी. पी. देवानंद, संचालक संशोधन डॉ. राजेंद्र पाटील, संचालक विस्तार शिक्षण डॉ. भीमराव उल्मेक उपस्थित होते. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, कुलगुरू डॉ. मोरे यांच्या प्रयत्नाने ही प्रयोगशाळा विद्यापीठात सुरू होत आहे. करारावर कुलगुरू डॉ. मोरे आणि राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळातील दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सी. पी. देवानंद यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
या वेळी डॉ. मोरे म्हणाले, दुग्धोत्पादनवाढीसाठी कृत्रिम रेतन हा सर्वोत्तम मार्ग असून त्यासाठी उच्च प्रतीचे गोठीत वीर्यमात्रा असणे आवश्यक आहे. या अद्ययावत गोठीत रेत प्रयोगशाळेमुळे उच्च आणि निरोगी रेतमात्रा शेतकऱ्यांना मिळणार आहे. या प्रयोगशाळेद्वारे दरवर्षी एक कोटी रेतमात्रांचे उत्पादन होणार आहे. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या या प्रयोगशाळेला मदतीसाठी कृषी विद्यापीठ सदैव तत्पर आहे. दुग्धव्यवसायाच्या विकासातच शेतीचा विकास आहे.
डॉ. बूच म्हणाले, या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी शंभर कोटीचा निधी उपलब्ध झाला असून, या प्रयोगशाळेतून दरवर्षांला एक कोटी रेतमात्राचे उत्पादन केले जाणार आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाद्वारे विदर्भ आणि मराठवाडय़ात दुग्धोत्पादन वाढण्यासाठी नवीन प्रयोगाद्वारे सहकारी संस्थांची स्थापना केली जाणार आहे. डॉ. देवानंद म्हणाले, सध्या राज्यात पंचवीस लाख रेतमात्रांचे उत्पादन होत असून, शंभर लाख रेतमात्राची आवश्यकता आहे. ही गरज या प्रयोगशाळेद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे.

Story img Loader