नितीन बोंबाडे

डहाणू तालुक्यातील आदिवासींच्या चळणी, हुंबाचा पाडा, गेटीपाडय़ावर मूलभूत सुविधांचा अभाव

आदिवासी विकास खाते आदिवासींच्या विकासाचा ढोल बडवत असले तरी डहाणू तालुक्यातील आदिवासी पाडय़ांवर वीज, पाणी रस्ते यासारख्या मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासींच्या नशिबी वणवण कायम आहे. गेली कित्येक वर्षे विजेची सोय नसल्याने पाडय़ांवर अंधारात चाचपडत प्रवास करावा लागत आहे.

चळणी ग्रामपंचायतीचा  हुंबाचापाडा, गेटीपाडा, गावठाणपाडा या  डहाणू तालुक्यातील दुर्गम आदिवासी  पाडय़ांना भेटी दिल्यानंतर ही बाब उघड झाली. या पाडय़ांचा मूलभूत सुविधांसाठी आजही  झगडा सुरू आहे. आदिवासी बहुल भागातील सुमारे चार हजार लोकसंख्या निवारा, रस्ते, पाणी आणि विजेच्या प्रतीक्षेत आहे.

डहाणूच्या दुर्गम भागातील हा आदिवासी समाज हा मोलमजुरी करून कुटुंबाचे पोट भरतो.  येथील कुटुंबांना अद्याप पक्की घरे मिळालेली नाहीत. शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ अनेकांना मिळालेला नाही. निवारा नसल्याने अर्धी अधिक कुटुंबीय विटभट्टीत काम करण्यासाठी स्थलांतरित झाले आहेत.

मोलमजूरी शेतमजुरी आणि गुरे राखण्याची कामे केली जातात. शिक्षण, आरोग्य तसेच आवश्यक मूलभूत गरजा पूर्ण केल्या जात नसल्याने आदिवासींच्या विकासाचे चित्र सध्यातरी कागदावरच राहिले आहे.

प्रवासखर्च खिशाला सोसवेना

* डहाणूच्या मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या पलीकडील सायवनभागात किन्हवली, दाभाडी, सुखंडआंबा, चळणी,निंबापुर, सायवन, यासह ही गावे आजही विकासापासून वंचितच आहे.

* रोजगार, शिक्षण, दळणवळण, आरोग्य यांचा या भागात अभाव आहे. मुलांना शिक्षणासाठी शासकीय आश्रमशाळांशिवाय  पर्याय नाही. वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही तर अनेकांना शिक्षण सोडावे लागले आहे.

* रोजगार नसल्याने विटभट्टी अथवा रोजंदारीसाठी गावे ओस पडतात. डहाणू पंचायत समितीसाठी कोणत्या योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी साधारण १०० किलोमीटरचे अंतर कापून सरकारी कार्यालय गाठावे लागते.

* प्रवासासाठी अंदाजे २००रुपये खर्च येतो. शिवाय दिवसही खर्च होतो. एका फेरीत काम झाले नाही तर पुन्हा हेलपाटे मारणे शक्य होत नसल्याची वस्तुस्थिती येथील एका सामाजिक कार्यकर्त्यांने सांगितली. डहाणू तहसीलदार, प्रांत कार्यालयासाठी शहराशी वेळोवेळी संपर्क साधू शकत नाहीत.त्यामुळे शासनाने या भागाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची गरज बोलून दाखविण्यात आली.

सायवन, चळणी, किन्हवली, दाभाडी या भागात वाहतूक, शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. सरकारी अधिकारी याकडे फारसे गांभीर्याने पाहत नाहीत.परिणामी आदिवासींचा विकास रखडलेला आहे

-महादू चौधरी, सामाजिक कार्यकर्ते

ग्रामीण भागात अनेक गाव पाडय़ात विकास कामांचा आढावा घेऊन कामे सुरु आहेत.ज्या भागात मुलभुत समस्या तीव्रतेने जाणावतात तेथे प्राधान्याने कामे केली जात आहेत.

– बी. एच. भरक्षे गट विकास अधिकारी डहाणू

Story img Loader