सांगलीचे शांघाय, डासमुक्त शहर, २४ तास आणि तेही शुद्ध पाणी ही आश्वासने ऐकत सांगलीकर पुन्हा एकदा आपल्या शहराचे भवितव्य कोणाच्या हाती द्यायचे याचा निर्णय येत्या दोन महिन्यांत घेणार आहेत. पक्षाचे झेंडे बदलतात, मात्र, चेहरे तेच आणि आश्वासनेही तीच, कारभार मात्र ग्रामपंचायत परवडली असा, आजवरचा अनुभव असा असताना पक्षीय पातळीवर मात्र, यंदा प्रथमच भाजपला संधी आहे.
महापालिकेची स्थापना होऊन १९ वर्षांचा कालावधी झाला. मात्र, प्रत्येक निवडणुकीत देण्यात आलेली आश्वासने, घोषणा या निवडणुकीच्या जाहीरनाम्यापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. पक्ष बदलतात, निवडणुकीतील चिन्हे बदलतात, मात्र मदानातील चेहरे तेच तेच असल्याचे चित्र आजपर्यंत सांगलीकरांनी अनुभवले आहे. केवळ झेंडे बदलल्याने शहराचा विकास होत नाही हे सत्य असताना पुन्हा पुन्हा तोच प्रयोग पाहण्याची वेळ सांगलीकरांवर येते. या वेळीही यापेक्षा वेगळे काही घडेल असे चित्र नाही.
अशा स्थितीत राजकीय पक्ष केवळ सत्ता हस्तगत करणे हेच ध्येय उराशी बाळगून कार्यरत असल्याचे चित्र दिसत आहे. खासदारकी, आमदारकी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्’ाातील काही नगरपालिका व ग्रामपंचायतींची सत्ता भाजपने हस्तगत केली असली, तरी या वादळात भाजपचे निष्ठावंत कुठे आहेत हे शोधण्यासाठी दुर्बीण घ्यावी लागेल अशी सध्याची स्थिती आहे. कारण निष्ठावंतांपेक्षा आयारामांचा आवाज मोठा झाला असल्याने अंग चोरून गर्दीत उभे राहण्याची वेळ निष्ठावंतांवर आली आहे.
यामुळेच केवळ झेंडे बदलले, माणसे मात्र तीच असल्याचे दिसत असल्याने महापालिकेतही वेगळा विचार, वेगळी धोरणे, अथवा शहर विकासाचा एखादा दिशादर्शक कार्यक्रम कोणाकडेच दिसत नाही.
काँग्रेसची कोंडी करण्याच्या नादात राष्ट्रवादीने आपली रसद, कुमक भाजपच्या राहुटीकडे वळविली. त्यामुळे राष्ट्रवादीचा तंबू उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असली तरी अद्याप यापासून शहाणपण घ्यायला पक्षीय पातळीवरून कोणी तयार नाही.
महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आज सर्वच राजकीय पक्षांची मोच्रे बांधणी सुरू आहे. काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे हा प्रश्न अद्याप अधांतरी असून, काँग्रेससाठी डॉ. पतंगराव कदम आणि मदन पाटील यांची उणीव यावेळी प्रकर्षांने जाणवत आहे. मदन पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्री पाटील यांच्या नावाने नेतृत्व उभे राहू शकेल याची खात्री सध्याच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनाही वाटत नाही. यातच कदम गटाचे वारसदार म्हणून पुढे केले जात असलेले विश्वजीत कदम पलूस-कडेगावच्या पोटनिवडणुकीवर लक्ष केंद्रित करून असल्याने त्यांचाही फारसा उपयोग शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना होईल असे दिसत नाही. यामुळे काँग्रेसची नौका भरकटण्याचाच धोका दिसत असून महापालिकेत सत्ता उपभोगत असणारे पदाधिकारी संपूर्ण महापालिका क्षेत्रात प्रभाव पाडतील असे नाहीत.
सर्वच पक्षांमध्ये गटबाजी
- एकीकडे काँग्रेसची अवस्था भरकटलेल्या नौकेसारखी झाली असतानाच सत्तेचा प्रबळ दावा करणारी राष्ट्रवादीही गटबाजीने पोखरली आहे. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या अतिउत्साही भूमिकेवर विद्यमान नगरसेवकच नाराजी व्यक्त करीत असतात, याचा आवाज मात्र विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्या रूपाने माध्यमांतून घुमत असतो. ही गटबाजी मोडून काढण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांना फारसा वेळ लागणार नाही. मात्र, इच्छाशक्तीचा अभाव हेच मूळ दुखणे आहे. वेळीच इलाज केला नाही तर जखम आणि आजार बळावतो, अशी स्थिती राष्ट्रवादीची झाली आहे.
- नेमक्या याच स्थितीचा लाभ घेण्याचे प्रयत्न भाजपचे सुरू आहेत. सत्तेसाठी भाजपची दारे सताड उघडी ठेवली असून याला निष्ठावंत गटाकडून होत असलेला विरोध सध्या तरी दुर्लक्षित करण्यातच धन्यता मानली जात आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत असलेली सत्ता ही भाजपची मिळकत असून यावर व्याजापोटी महापालिकेची सत्ता घेण्याचे पक्षाचे प्रयत्न असून यामागे पुढे होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठीच मशागत म्हणून याकडे पाहिले जात आहे.
- महापालिकेच्या सत्तेच्या राजकारणात मिरज पॅटर्न हा परवलीचा शब्द ठरला आहे. लाभाचे काही दिसले तर मिरजेचे लोकप्रतिनिधी आपले वाद बासनात बांधून एकत्र येतात हा आजवरचा अनुभव आहे. यामुळे मिरजेच्या राजकारणावरच महापालिकेतील सत्तेचे गणित अवलंबून राहणार आहे. यासाठी मिरज संघर्ष समितीच्या मांडवाखाली पक्षविरहित आघाडी उदयास आली तर नवल नाही. याच दिशेने मोच्रेबांधणी सुरू असून या मोच्रेबांधणीला काँग्रेस, राष्ट्रवादी यांची मूक संमती दिसत आहे. भाजपही या आघाडीच्या राजकारणाचा लाभ मिळेल अशा आशेवर सध्या तरी आहे. मात्र, २५ हजार मतदारांचा एक प्रभाग असल्याने एकमेकांचे सहकार्य घेतल्याविना कोणाचाच टिकाव लागण्याची शक्यता नसल्याने अपक्ष लढण्याचे मनसुबे मात्र धुळीला मिळाले आहेत.