विश्वास पवार

सातारा जिल्ह्य़ात करोना रुग्णांची संख्या साडेपाच हजारांच्या पुढे आहे. त्यातील २,६७७ जण उपचारातून बरे झाले आहेत. गेल्या तीन आठवडय़ांपासून रोज दीडशे ते दोनशे रुग्ण आढळत आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्य़ात दौरा करत समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेतला.

करोनाबाबत कठोर उपाययोजना करण्याची गरज असताना, खंबीर नेतृत्वाची गरज जिल्हावासीयांना जाणवली. कठीण प्रसंगी कोणी-कोणाशी संपर्क ठेवायचा अडचणीच्या प्रसंगी कोणाकडे धाव घ्यायची हेच नागरिकांना समजत नाही. करोनाचा मुकाबला करण्यात जिल्हा रुग्णालय अपयशी ठरल्याची नागरिकांची तक्रार आहे.

या रुग्णालयातील अनेक प्रकार चव्हाटय़ावर आले. गेल्या आठवडय़ात साफसफाई दरम्यान शौचालयात मृत अर्भक आढळून आले. एकूणच तक्रारी वाढल्यावर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या बदलीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कराड येथे करावी लागली.

सातारा जिल्ह्य़ातील परिस्थितीची जाणीव असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेऊन आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राहील असे वातावरण तयार करावे लागले. राजेश टोपे यांनी गैरकारभार खपवून घेणार नाही असा इशारा प्रशासनाला दिला. साताऱ्यात पुढील वर्षीपासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात असंवेदनशीलता खपवून घेणार नाही, असा इशारा टोपे यांनी दिला. सातारा जिल्ह्य़ातील पवार यांच्या दौऱ्यात कोल्हापूर व सांगली तसेच सोलापूर येथील प्रमुख नेते त्यांना भेटून गेले.

‘उपचाराला नकार दिल्यास कारवाई’

सातारा कोल्हापूर जिल्ह्य़ांत खासगी रुग्णालयांनी ज्यादा बिले घेतल्याचा तक्रारी आहेत. यासाठी कोल्हापुरातील ४५ व सातारा येथील २७ रुग्णालयांची यादी जाहीर करणार आहे. येथे शासकीय योजनांचा फायदा रुग्णांना घेता येईल असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नमूद केले.  सर्व जिल्ह्य़ातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरली जातील तसेच करोना नसणाऱ्या रुग्णांवर उपचारास नकार देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Story img Loader