रत्नागिरी : शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने बारा लाखाचा दंड केला आहे. तसेच येत्या दोन महिन्यांत वैद्यकीय महाविद्यालयात सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासह विद्यार्थ्यांसाठी पुरेसा शिक्षक वर्ग नेमण्यात यावा अशा सूचना या राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने केल्या आहेत.
राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेमार्फत देशभरात सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांच्या कारभाराची तपासणी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची तपासणी राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेकडून करण्यात आली. रत्नागिरीमधील वैद्यकीय महाविद्यालय सुरु होवून जेमतेम एक वर्ष होत आहे. मात्र या वर्षभरात या महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना पुरेशा शैक्षणिक सुविधा देण्यात आल्या नाहीत. अपुरा शिक्षक वर्ग आणि इतर सोयीसुविधांचा अभाव यामुळे येथील हे वैद्यकीय महाविद्यालय गेले वर्षभर चर्चेचा विषय बनले आहे.
हेही वाचा – सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मेळाव्यात गोंधळ
हेही वाचा – किनारपट्टी, विदर्भात मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु होऊन तीन वर्षे झाली असतानाही महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची परवड होत असल्याचे राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या सदस्यांना दिसून आले आहे. या दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांत असलेल्या अपुऱ्या सोयीसुविधा लक्षात घेवून राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने दोन्ही महाविद्याल्यांना बारा लाख रुपयांचा दंड केला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी वैद्यकीय परिषदेने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. येत्या दोन महिन्यांत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशा सूचना परिषदेने केल्या आहेत.