|| बिपीन देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारी दाखल होण्याचा आलेख उंचावला

मूळची ती औरंगाबादची. नोकरी तिची रत्नागिरीत. तर तिचा पती मुंबईत काम करतो. या दाम्पत्याला अडीच वर्षांचा एक मुलगा. पण दोघेही अलीकडे विभक्त राहतात. पती आई-वडिलांचे ऐकतो, ही तिची तक्रार. हे दोघे विभक्त होण्याचे एक प्रमुख कारण. तरुणीला आता एकत्र राहायचेय. नोकरीही सोडायची तिने तयारी दाखवली आहे. पण दोघांच्या भेटीच्या तारखा जुळत नाहीत. पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात आलेले हे शुक्रवारचे एक उदाहरण. केंद्रात सध्या पाय ठेवायलाही जागा मिळू नये, एवढी महिला-पुरुषांची गर्दी. त्यात वयोवृद्ध आई-वडील, लहान मुलेही. कुटुंब व्यवस्थेची होणारी वाताहत हे चित्र चिंता वाढवणारे आहे.

औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात सध्या वादांची वार्ता प्रत्येक टेबलावरून ऐकायला मिळते. सात ते आठ समुपदेशक व त्यांच्या समोर बसलेले कुटुंबातील वाद सोडवण्यासाठी आलेले दाम्पत्य किंवा एक-एक सदस्य. कायम गजबजलेले हे कार्यालय. मागील पाच वर्षांत कार्यालयाकडे येणाऱ्या महिलांवरील अत्याचारासंबंधातील तक्रारींचा आलेख चढता-उतरता दिसतो आहे. २०१६ मध्ये कार्यालयाकडे तब्बल ९६७ तक्रारी दाखल झाल्या होत्या. २०१७ मध्ये त्यातील आकडेवारी कमी झाली. ७७५ तक्रारी महिलांच्या अत्याचारासंबंधातील होत्या. तर २०१८ च्या ऑगस्ट महिन्याअखेपर्यंत ४१९ तक्रारी दाखल झाल्या असल्याची माहिती कार्यालयाकडून मिळाली. २०१३ मध्ये ४६३ तर २०१४ मध्ये ४९७ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या पुढच्या दोन वर्षांत तक्रारींचा आलेख चढता राहिला. तर २०१७ मध्ये तक्रारींची आकडेवारी काहीशी कमी झाली. २०१८ च्या ऑगस्टअखेपर्यंत समझोत्यासाठी महिला सहाय्य कक्षाकडे दाखल प्रकरणांची अर्ज संख्या १००५ एवढी आहे. त्यात २३३ प्रकरणांमध्ये समझोता झाला. त्यातील १३९ प्रकरणे निकाली काढली. तर न्यायालयात जाण्याचा मार्ग १२१ प्रकरणातील अर्जदारांनी स्वीकारला. इतर पोलीस ठाण्यांमध्ये ७१ प्रकरणे वर्ग केली. तर ५६४ प्रकरणे चौकशी टप्प्यातअसल्याची माहिती कार्यालयाकडून देण्यात आली.

समुपदेशक अधिकारी चव्हाण सांगत होते की, अनेक प्रकरणे येतात. समुपदेशन करण्यावर आम्ही भर देतो. काही धर्मामध्ये एकदा महिलेला सोडून दिले तर पुन्हा तिचा संसार जुळणे कठीण जाते. मात्र दोन्ही कुटुंबांकडून प्रतिसाद मिळाला, जुळवून घेण्याची तयारी दाखवली तर पुन्हा संसारगाडा मार्गी लागतो, अशीही अनेक उदाहरणे घडत आहेत. तर दुसऱ्या एका समुपदेशकाने सांगितले की, जालन्यातील एका कुटुंबाची काही क्षुल्लक कारणावरून वाताहत झाली. सहा जणांवर याचा परिणाम झाला . त्यात चार लहान मुलांचा समावेश आहे.

समुपदेशनातून अनेक संसार मार्गी

मोबाइलवर बोलणे, आई-वडीलांबरोबरचे वागणे, संशयीवृत्ती यातून कुटुंबातील शांती बिघडत आहे. सामोपचाराने प्रकरण मिटवण्यावर भर दिला जात आहे. वेगवेगळ्या टेबलवरून समुदेशक कुटुंबातील सदस्यांना समजावण्याचे काम करीत आहेत. अनेक संसार मार्गी लागले आहेत.     – किरण पाटील, पोलीस निरीक्षक

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of women security in maharashtra
Show comments