जिल्ह्य़ातील नव्यानेच अस्तित्वात आलेल्या गुहागर आणि देवरुख या दोन नगर पंचायतींवरील १७ पैकी ९ जागांवर महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्यामुळे दोन्ही ठिकाणी महिलांचे वर्चस्व राहणार, असे स्पष्ट झाले आहे.
या दोन नगर पंचायतींच्या निर्मितीबाबतची अधिसूचना जारी झाल्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. त्यानुसार नगर पंचायत क्षेत्राचे प्रभाग पाडून एकूण जागा आणि त्यावरील आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यापैकी गुहागर नगर पंचायतीमध्ये एकूण ४ प्रभाग राहणार असून प्रभाग १, २ व ४ मध्ये प्रत्येकी ४ सदस्य, तर प्रभाग ३ मध्ये ५ सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. त्यापैकी प्रभाग १, २ आणि ४ मध्ये स्त्रियांसाठी प्रत्येकी २ जागा, तर प्रभाग ३मध्ये तीन जागा राहणार आहेत.
प्रांताधिकारी प्रसाद उकार्डे यांच्या उपस्थितीत या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्याचप्रमाणे प्रभागांची रचनाही जाहीर करण्यात आली. नगर पंचायतीच्या संदर्भातील यापूर्वीच्या सभांना गुहागरकरांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. पण प्रत्यक्ष आरक्षण सोडतीच्या वेळी तसा उत्साह दिसून आला नाही.
निवासी उपजिल्हाधिकारी एस.आर.बर्गे यांच्या उपस्थितीत देवरुख नगर पंचायतीच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. याही नगर पंचायतीच्या क्षेत्रात एकूण ४ प्रभाग असून त्यामध्ये प्रभाग १, २ आणि ३ मध्ये प्रत्येकी २ जागा, तर प्रभाग ४ मध्ये ३ जागा महिलांसाठी राखीव आहेत. नगर पंचायतीची प्रारूप प्रभाग रचना येत्या शुक्रवारी (१४ डिसेंबर) जाहीर होणार असून त्यामध्ये सदस्यांचे प्रभागनिहाय आरक्षणही प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यावरील हरकती आणि प्रभाग रचना व आरक्षणाचा अहवाल कोकण आयुक्तांकडे २८ डिसेंबरला सादर होणार असून ३१ डिसेंबर रोजी अंतिम अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
नव्याने आकाराला येत असलेल्या या नगर पंचायतींमध्ये अशा प्रकारे महिलांसाठी ५० टक्क्यांहून अधिक जागा राखीव असल्या तरी आरक्षण सोडतीच्या वेळी एकही महिला सभागृहात उपस्थित नव्हती.

Story img Loader