जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांच्या विरोधात जिल्ह्यांतर्गत असंतोष कायम असून महिला पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या विरोधात असलेली धुसफूस अद्याप शमलेली नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी येथे होणाऱ्या पक्षाच्या विभागीय मेळाव्यातही हा विषय गाजण्याची शक्यता आहे. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा मंगला पाटील यांनी यापूर्वीच पक्षाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकले होते. खा. सुप्रिया सुळे, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या मेळाव्यात मंगला पाटील यांनी डॉ. पाटील यांच्या कार्यपद्धतीचा पाढा वाचल्याने सर्वच नेते अवाक झाल्याचे सांगण्यात येते. परंतु डॉ. पाटील यांच्या विरुद्धच्या तक्रारींची कोणतीच दखल अद्याप राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी घेतलेली नाही. तक्रार करणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून डॉ. पाटील पदावर कायम आहेत. असे असले तरी त्यांच्या विरोधातील असंतोष अधिकच वाढीस लागल्याचे चित्र आहे. दरम्यान, आगामी निवडणुका तसेच पुढील वर्षी होणाऱ्या जळगाव महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य नेते व मंत्र्यांच्या उपस्थितीत येथे शुक्रवारी पक्षाचा विभागीय मेळावा होणार आहे. मेळाव्याचे आयोजन पालकमंत्री गुलाब देवकर यांच्या वतीने करण्यात आले असून मंगला पाटील या देवकर समर्थक असल्याने डॉ. पाटील यांच्याविषयीचा विरोध मेळाव्यात व्यक्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डॉ. अस्मिता पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी अजित पवार यांच्याच शिफारशीवरून नियुक्ती झाल्यापासून त्या वादग्रस्त ठरल्या आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून त्या पक्षाशी संबंधित आहेत काय, पक्षासाठी त्यांचे योगदान काय, जिल्ह्यात पक्षाच्या बांधणीसाठी त्यांचे प्रयत्न कोणते, पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त जिल्ह्यात त्यांनी किती दौरे केले, जिल्हा, तालुका व गावपातळीवर महिलांचे किती मेळावे व शिबिरे घेतली, अशी प्रश्नांची मालिका डॉ. पाटील यांच्या विरोधात उपस्थित केली जात आहे.