Ladka Bhau Yojana or Mukhyamantri Yuva Prashikshan Yojana : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. मात्र या योजनेनंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली की “लाडक्या बहिणीसाठी योजना आणलीत, मात्र बेरोजगार असलेल्या लाडक्या भावाला काहीच दिलं नाही”. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आमच्या सरकारने लाडक्या भावांसाठीही योजना आणली आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला (१६ जुलै) पंढरपुरात आयोजित एका कृषी मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी खास योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत राज्य सरकारने तरुणांना कारखाने व उद्योगांमध्ये अप्रेन्टिसशिपसह स्टायपंड देण्याची घोषणा केली. याअंतर्गत १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना १० हजार रुपये स्टायपंड म्हणून मिळतील असं शिंदे यांनी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठी या योजनेची घोषणा केली खरी, मात्र ही योजना आत्ता जाहीर केलेली नाही. ही योजना गेल्या महिन्यात सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पाद्वारे जाहीर केली होती. सरकारने लाडक्या भावांसाठी कुठलीही नवी योजना जाहीर केलेली नाही. त्यांनी जुन्याच योजनेला ‘लाडका भाऊ योजना’ म्हटलं आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

आव्हाड यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की लाडका भाऊ वगैरे अशी कोणतीही नवीन योजना नाहीये, तर अर्थसंकल्पात जाहीर केलेली योजनाच परत सांगितली जात आहे. त्यातही तरुणांना १०,००० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता सरकारने त्याची ६०००, ८००० आणि १०,००० रुपये अशी विभागणी केली आहे.

अर्थसंकल्पात जाहीर केलेली योजना

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना : यांतर्गत दरवर्षी राज्यातील १० लाख तरुण-तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना’- प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा १० हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन म्हणून दिले जातील. यासाठी दरवर्षी सुमारे ६ हजार कोटी रुपये खर्च केले जातील.

लाडका भाऊ योजनेबाबत जितेंद्र आव्हाडांची पोस्ट

हे ही वाचा >> Jayant Patil On Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला; म्हणाले, “काही असंतुष्ट आत्मे…”

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

पंढरपूरमधील कृषी मेळाव्यात एकनाथ शिंदे म्हणाले होते, “आपल्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काही लोक म्हणाले, लाडक्या बहिणीसाठी योजना आणलीत, आता लाडक्या भावांचं काय? मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे की लाडक्या भावांवरही आमचं लक्ष आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठीही योजना आणली आहे. राज्यातील तरुण विद्यार्थी एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप (Apprenticeship) करतील, तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि ते त्या-त्या कामात कुशल होतील. त्या अनुभवाच्या जोरावर त्यांना नोकरी देखील मिळेल. या काळात राज्य सरकार त्यांना स्टायपंड देईल.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladka bhau yojana jitendra awhad claims there is no such scheme asc