December Installment Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम पुन्हा जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेतील निधी आचारसंहितेमुळे अडकला होता. परंतु, आता नव्याने स्थापन झालेल्या सरकारने पुन्हा एकदा ही योजना कार्यान्वित केली असून पात्र महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
१२ लाख ८७ हजार बहिणींच्या खात्यात या योजनेआंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी आज जमा करण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात उर्वरीत लाभार्थ्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा केला जाणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. तसंच, आधार प्रमाणिकरण होत नसल्याने अनेक महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या होत्या. पण आता ज्या महिलांचे आधार प्रमाणीकरण झाले, त्यांनाही लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
दीड हजार मिळाले, २१०० रुपये कधी मिळणार?
महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेतील सन्माननिधी वाढवण्याची तरतूद त्यांच्या वचननाम्यात दिली होती. परंतु, सध्या प्राप्त झालेल्या हप्त्यानुसार महिलांना केवळ १५०० रुपये मिळत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महिलांना २१०० रुपये कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर आदिती तटकरे म्हणाल्या, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत सरकारची योजना सांगितली होती. पुढच्या वर्षी अर्थसंकल्प मांडण्यात येईल. तेव्हा सकारात्मक पद्धतीने विचार केला जाईल. सध्या आचारसंहितेच्या कालावधीत स्थगित केलेल्या निधी वितरणाची सुरुवात करण्यात आली आहे”, असं आदिती तटकरे यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
हेही वाचा >> Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट…
नव्याने नोंदणी केव्हा सुरू होणार?
विविध तांत्रिक अडचणींमुळे काही महिलांना अर्ज करता आलेला नाही. त्यामुळे नव्याने नोंदणी केव्हा सुरू होणार असा प्रश्न महिलांकडून विचारला जातोय. त्यावर आदिती तटकरे म्हणाल्या, “नोंदणी करण्याची शेवटची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत होती. तोपर्यंत अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांची नोंदणी झाली आहे. अद्याप पुन्हा नोंदणी सुरू करण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही. पात्र महिलांपर्यंत सध्या आम्ही सन्माननिधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.”
अर्जांची पुन्हा छाननी होणार?
दरम्यान, या योजनेसाठी निकष बदलण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे अनेक लाभार्थी महिला या योजनेतून अपात्र ठरतील अशी शक्यता वर्तवण्यात आली. पात्र महिलांच्या अर्जांची पुन्हा छाननी होणार का? यावर आदिती तटकरे म्हणाल्या, “यासंदर्भातील भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे. याबाबतची पुनर्पडताळणी करण्यात येईल. तक्रारी आल्या असतील तर योग्यपद्धतीने तपासून घेतल्या जातील. सरसकट पुनर्पडताळणी घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. निकषही बदलले नाहीत.”
“स्थानिक पातळीवर, तलाठी कार्यालय, योजना पोहोचवण्याऱ्या यंत्रणा, आशा सेविका, सेवा सुविधा केंद्रात लाभार्थ्यांसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या तर त्याची चौकशी केली जाईल. डीबीटी करताना जाणवलं की एकाच आधारकार्डवर नोंदणी झालेल्या आहेत, तेव्हा आम्ही कारवाई केली आहे”, असंही आदिती तटकरे म्हणाल्या.