How to Check Ladki Bahin Yojana Payment Status in Bank Account : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत तीन हप्त्यांचे साडेचार हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर, दिवाळीनिमित्त सरकारकडून भाऊबीज दिली जाणार आहे. त्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र जमा केले जात आहे. १० ऑक्टोबरपर्यंत हे पैसे दिले जाणार होते. परंतु, ठरलेल्या तारखेच्या आधीच सरकारने बहिणींच्या खात्यात भाऊबीजेची ओवाळणी करायला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार, जैल महिन्यापासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला या योजनेकरता अर्ज करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला होता. त्यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आली. अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या वाढत गेल्याने आणि काही तांत्रिक अडचणींमुळे अर्जदारांचा खोळंबा झाल्याने सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवली. त्यामुळे दोन कोटींहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत.
जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे १४ ऑगस्टपासून खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली. तर, सप्टेंबर महिन्यातील पैसे १ ऑक्टोबर रोजी खात्यात जमा झाले. पहिल्या दोन महिन्यांचे पैसे ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे मिळाले नव्हते त्यांनाही ऑक्टोबर महिन्यांत या योजनेतील पैसे मिळाले. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी २ ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनुसार, १,९६,४३,२०७ महिलांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे देण्यात आले होते. तर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ ऑक्टोबरला दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील २ कोटी २० लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.”
हेही वाचा >> Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेबाबत सरकारच्या महत्त्वाच्या सूचना; आता ‘त्या’ बँकांवर कारवाई होणार
दरम्यान, जुलै ते सप्टेंबर अशा तीन महिन्यांचा सन्मान निधी महिलांना प्राप्त झाल्यावर राज्य सरकारने मोठी घोषणा केली होती. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याचे वचन सरकारने दिलं होतं. त्यानुसार, ८ ऑक्टोबरपासून या दोन महिन्यांचेही पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. अनेक पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिवाळीआधीच सरकारने बोनस दिल्याने पात्र महिलांनी आनंद व्यक्त केला आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही कसं तपासाल?
अर्जात दिलेल्या बँक खात्यावर हे पैसे जमा केले जात आहेत. त्यामुळे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यास तुम्हाला तत्काळ बँकेकडून त्यासंदर्भात मेसेज केला जातो.
जर, तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. त्यामुळे सर्वांत आधी बँकेत जाऊन तुमचं खातं आधार कार्डशी लिंक करून घ्या.
तुमचे एकापेक्षा अधिक बँक खाती असतील तर ज्या बँकेचं सिडिंग म्हणजे आधार कार्ड लिंक केलेलं असेल तिथे तुमचे पैसे जमा होतात. त्यामुळे तुमचे पैसे कोणत्या खात्यात जमा झाले आहेत हे तपासायचं असेल तर आधार कार्डच्या संकेतस्थळावर जाऊन सिडिंग स्टेटस तपासावं लागेल. ते कसं तपासाल हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.