Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले आहे. काही दिवसांपूर्वी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १ कोटी महिलांनी अर्ज भरले असून अनेकजणींना पात्र ठरल्याचे संदेशही मिळाले आहे. दरम्यान, रक्षाबंधनादिवशी हे पैसे खात्यात जमा होणार होते. परंतु, आता याची तारीख बदलण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माहिती दिली. ते दिंडोरी येथे आयोजित केलेल्या जनसन्मान यात्रेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“उद्याच्या १९ तारखेला रक्षाबंधन आहे. मला आजच्या सभेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम माय माऊलींना, बहि‍णींना आणि मुलींना सांगायचं आहे की रक्षाबंधनाच्या निमित्ताने माझी लाडकी बहीण योजना तुमच्याकरता दिली आहे. संबंध महाराष्ट्रात याची चर्चा सुरू आहे. गावागावात, तांड्यावर, वाडी वस्तीवर महिलांना कळलं आहे की अशी काही योजना आली”, असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >> Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घ्यायचा? कुठे कराल अर्ज? पात्र कोण? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

“कित्येक घरात आई स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन मुलांना खाऊ घालते. स्वतःच्या आवडीला मुरड घालून आपल्या कच्या बच्च्यांकरता करत असते. पण तिलाही वाटत असेल की आपण स्वतःकरता काहीतरी करावं. अनेक प्रकारची कामं माझे महिला भगिनी करत असतात. राहणीमान बदललं असलं तरीही महिला सबलीकरण केलं पाहिजे. महिलांना मान सन्मान, प्रतिष्ठा करून देण्याचं काम महिला धोरणातून आणलं आहे. त्यांनी तयार केलेल्या वस्तूला बाजारपेठ कशी मिळेल, त्यांच्या घरात पती कमावतो, त्यांचं ऐकावं लागतं. पण त्या महिलेलाही मन आहे. तिलाही वाटतं मी ही काहीतरी करावं माझ्या मुलाबाळांकरता. परंतु, इतके दिवस सर्वांनी तिथे दुर्लक्ष केलं. आम्हीही जबाबदार आहोत. त्यामुळे यावेळेस अर्थसंकल्प आणत असताना अडीच लाखांहून कमी उत्पन्न असलेल्या महिलांना दीड हजार रुपये द्यायचे. (Ladki Bahin Yojana) आई-बहिणींनो घाबरू नका. तुमचे अर्ज भरून घेतले जात आहेत. मी कुठेही कमी पडणार नाही. वाट्टेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल”, असंही अजित पवार म्हणाले.

किती तारखेला मिळणार लाडकी बहिण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पैसे?

“१९ तारखेला रक्षाबंधन आहे. आमचा प्रयत्न सुरू आहे की १७ तारखेला पात्र महिलांना पैसे (Ladki Bahin Yojana) मिळणार. आतापर्यंत पात्र महिलांची संख्या सव्वाकोटीपर्यंत पोहोचली आहे. कदाचित ही संख्या दीड ते दोन कोटींपर्यंत जाईल, पण काही हरकत नाही. कालच मी सहा हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आलो आहे. तुमच्या स्वतःकरता काही लागत असेल ते घेण्याचा प्रयत्न करा”, असं पवार म्हणाले. तसंच, “महायुतीचं सरकारआणण्याकरता तुम्ही आम्हाला पाठबळ द्या. आम्हाला सहकार्य करा. कायम पुढे पाच वर्षे तुमची योजना चालेल हा अजित दादाचा वादा आहे”, असं आवाहनही त्यांनी केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladki bahin yojana ajit pawar declaire new date of deposite money under scheme sgk