Ladki Bahin Yojana application scrutiny Aditi Tatkare : विधानसभा निवडणूक निकालांना ‘कलाटणी’ देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेलाच सरकार कलाटणी देणार असल्याची सध्या चर्चा आहे. अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जातील, असं सांगितलं जात आहे. दरम्यान, खरंच अशी छाननी होणार आहे की नाही याबाबत माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
आदिती तटकरे यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवत असताना आम्ही ती योजना अगदी व्यवस्थितपणे राबवण्याचा प्रयत्न केला आहे. २ कोटी ४० लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. कोणत्याही योजनेची एवढ्या मोठ्या संख्येने छाननी केली जाणार नाहीये. त्यासाठी मुळात तक्रार याव्या लागतात. मी आता त्या विभागाची मंत्री नाही. तेव्हा अशा पद्धतीने तक्रार आली असेल तर माझ्याकडे त्याबद्दलची माहिती नाही. छाननी किंवा चाचणी करायची झाल्यास तक्रारीच्या आधारे करावी लागते. कोणी तक्रारी केल्या तर त्या तपासल्या जातील. मी मंत्री असताना अशा तक्रारी आल्या नव्हत्या. आत्ता आल्यात की नाही ते मला माहिती नाही. कोणीही अशा पद्धतीने तक्रार केली असेल तर विभागाचे आधिकारी निर्णय घेतात. आता तक्रारी आल्यात की नाही यासंदर्भातील मला माहिती नाही. अतिशय प्राथमिक छाननी करून आधार सिडिंग करून लाभार्थी निवडले आहेत. त्यामुळे पुढच्या कालावधीत ही योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबवताना जर छाननी करायची असेल तर तक्रारींच्या आधारावरच केली जाईल. भविष्यात अशी छाननी होणार आहे की नाही याबाबत मी आत्ता भाष्य करू शकत नाही.
हे ही वाचा >> “…तर भारतात बांगलादेशसारखी स्थिती झाली असती”, मारकडवाडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य
३५ ते ५० लाख बहिणी ‘नावडत्या’ ठरणार?
महायुती सरकारच्या शपथविधी सभारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडकी बहीण योजना’ कायम राहणार असल्याचे जाहीर केले. तसेच आर्थिक नियोजनात योग्य प्रकारे सुसूत्रता आल्यानंतर वाढीव हप्ता (२,१०० रुपये) दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीआधी महायुतीने जनतेला आश्वासन दिलं होतं की आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना मासिक हप्ता म्हणून १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये देऊ. दरम्यान, निकषाबाहेरील महिला या योजनेचा गैरफायदा घेत असल्याच्या अनेक तक्रारी आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अर्जांची छाननी सुरू करण्यात आली असून २ कोटी ३४ लाख लाभार्थींपैकी १५ ते २० टक्के महिला अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजे ३५ ते ५० लाख महिलांना लाभावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.