Ladki Bahin Yojana : राज्यात सर्वत्र लाडकी बहीण योजनेची धूम आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना आकर्षित करण्याकरता राज्य सरकारने ही योजना आणली असल्याची टीका विरोधकांकडून केली जातेय. तर, राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना या योजनेसाठी राज्य सरकार निधी कुठून आणणार आहे? असाही प्रश्न सातत्याने विचारला जातोय. यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही टीका केली आहे. आज माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवारांनी टीका केली.
“या सर्व घोषणा आहेत. मला असं वाटतं की प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्याआधी एखाद-दुसरा हप्ता देण्याचा प्रयत्न होईल. एखाद-दुसरा हप्ता देऊन जनमानस निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतो. हे तात्पुरतं आहे. निवडणुकीच्या पूर्वी या लोकांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाहीत, अशी चर्चाही नागरिकांमध्ये आहे”, अशी टीका शरद पवारांनी केली.
अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण
दरम्यान, या योजनेवरून अनेकांनी टीका केल्यानंतर आता अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना राज्याच्या वर्ष २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली. चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण ३५ हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार ?, हा प्रश्नच उद्भवत नाही”, असं अजित पवार म्हणाले.
“महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे. राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असूच शकत नाही. काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या, या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसार माध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे. राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया”, असं आवाहनही त्यांनी केलं.