Ladki Bahin Yojana December Installment : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान महायुतीच्या या विजयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहे. याचबरोबर या निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या नेत्यांनी योजनेचे पैसे २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते. आता निवडणुकीनंतर राज्यातील महिला योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहे. अशात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी डिसेंबरचा हप्ता केव्हा येणार याबाबत माहिती दिली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या होत्या. या योजनांची पूर्तता करण्यासाठी ३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १,४०० कोटी रुपये इतक्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे.
काय म्हणाले उदय सामंत?
सध्या नागपूरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी पत्रकारांनी उदय सामंत यांना लाडकी बहिण योजनेचे पैसे केव्हा येणार याबाबत विचारले. या प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले, “काल पुरवणी यादीमध्ये १४०० कोटींची तरतूद झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.”
हे ही वाचा : “भुजबळांचा वापर करणाऱ्यांनीच आज त्यांना…”, मराठा आरक्षण विरोधी आंदोलनावरून संजय राऊत
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठे खाते मिळावे यासाठी आग्रही आहेत का, अस प्रश्नही सामंतांना विचारण्यात आला. त्यावर सामंत म्हणाले, “आपल्या नेत्याला मोठे पद, मोठे खाते आपल्या नेत्याला मिळायला पाहिजे यामध्ये माझीही तीच भावना आहे. मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षात मोठे नेते, एकनाथ शिंदेच आहेत. त्यामुळे त्यांना मोठे पद मिळाले पाहिजे असे मी म्हटलो तर, यामध्ये काहीही वावगे असू शकत नाही.”
हे ही वाचा : “सिगरेटच्या लायटरनं त्याचे डोळे जाळले, मृतदेहावर उड्या मारल्या”, विरोधी पक्षांकडून बीड घटनेचा निषेध करत सभात्याग!
कधीपासून मिळणार २१०० रुपये?
विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० वरून २१०० रुपये करणार असे अश्वासन दिले होते. आता निवडणुकीनंतर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर २१०० रुपये कधीपासून मिळणार याची महिला वर्गात चर्चा सुरू आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना नक्की २१०० रुपये मिळणार असल्याचे सांगितले. निवडणुकीत जी आश्वासने दिली आहेत ती सर्व आश्वासने पूर्ण करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.