Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी एक्स खात्यावरून दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अंमलात आणली आहे. १ जुलैपासून ही योजना कार्यान्वित झाली असून आतापर्यंक १ कोटी ३५ लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तर, रक्षाबंधाच्या पार्श्वभूमीवर १७ ऑगस्ट रोजी हा निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. परंतु, त्या आधीच पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याची माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी दिली. पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्याचे काही स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) १ कोटी ३५ लाख लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डिबिटीद्वारे लाभ जमा करण्यात येत आहेत. परंतु, पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे २७ लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याचे आदेश आदिती तटकरे यांनी दिले आहेत. तसंच, कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी. येत्या १७ ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, अशा सूचना तटकरे यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा >> Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवली, केव्हापर्यंत करता येणार अर्ज? आदिती तटकरे म्हणाल्या…

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. ३१ ऑगस्ट़नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यानाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ (Ladki Bahin Yojana)

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या १७ ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत. परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही, अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे. कोणतीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत. १७ ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत, असे आवाहनही तटकरे यांनी यावेळी केले.

१ ऑगस्टनंतर आलेल्या अर्जांची छाननी आजपासून होणार (Ladki Bahin Yojana)

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 ऑगस्टनंतर आलेल्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जांचे छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन तयार केले आहे. अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिकस्तरावर अधिकारही देण्यात आले आहेत. यासंबंधी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे. या ॲप्लिकेशनमध्ये वॉर्डस्तरीय, विधानसभा निहाय आकडेवारी उपलब्ध होणार आहे, असे महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladki bahin yojana first installment of scheme has been deposited in validate bank accounts sgk