Action Against Missused of Ladki Bahin Yojana : महिला असल्याचे भासवून पुरुषांनीच लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. जवळपास ३८ खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा आता समोर आला आहे. यापूर्वीही असाच एक गैरप्रकार नवी मुंबईतून समोर आला होता. अशा प्रकारांमुळे सरकारमध्ये धास्ती वाढली असून सरकारने याविरोधात आता कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भातल महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली. त्या आज माध्यमांशी बोलत होत्या.
“सरकारच्या विविध शासकीय योजनेतील आधार कार्डचा गैरवापर करून लाडकी बहीण योजनेसाठी एका व्यक्तीने ३७-३८ अर्ज भरले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या ते लक्षात आलं आहे. या संबंधित चौकशीसठी सर्व अधिकारी तेथे गेले आहेत. तसंच, यासंदर्भातल जिल्हाधिकाऱ्यांबरोबर माझं बोलणं झालं असून मी आदेश दिले आहेत. संबंधित ३७-३८ खात्यांतील बँकांमध्ये संपर्क साधून ही खाती सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, या बँक खात्यात पुढच्या काळात कोणत्याच शासकीय योजनांचा लाभ किंवा कोणतेही शासकीय व्यवहार होता कामा नये”, असं आदिती तटकरे म्हणाल्या.
“साधारणपणे कोणतीही प्रक्रिया करत असाताना १५ ते २० दिवसांचा कालावधी वेरिफिकेशनसाठी देत असतो. १ ते ३१ जुलैदरम्यान स्वीकारल्या गेलेल्या पात्र महिलांना १७ ऑगस्ट रोजी हप्ता देण्यात आला. १ ते २४ ऑगस्टमध्ये स्वीकारलेल्या अर्जदार ५२ लाख महिलांना ३१ ऑगस्ट रोजी सन्मान निधी देण्यात आला. पहिल्या दोन महिन्यांत तांत्रिक अडचणींमुळे ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते त्यांच्यासहीत पहिले दोन लाभ ज्या महिलांना मिळाले होते त्या सर्वांना २५ तारखेपासून लाभ देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत २ कोटी ४५ लाखांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. आता २ कोटी १० लाख महिलांना लाभ देत आहोत”, असंही आदिती तटकरे म्हणाल्या.
तिसऱ्या हप्त्याविषयी आदिती तटकरे काय म्हणाल्या?
आदिती तटकरे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक २९ सप्टेंबर रोजी ३४,७४,११६ भगिनींना ५२१ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हफ्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत.