March Installment Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा येण्याच्या आधीपासून चर्चेत आलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेच्या पुढील हप्त्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला दिन म्हणजेच ८ मार्चच्या आधी ७ मार्चच्या संध्याकाळपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधीची रक्कम जमा होणार आहे. आदिती तटकरेंनी याबाबत पोस्ट करुन माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पात्र महिलांसाठी आहे लाडकी बहीण योजना

ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली आहे. आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे एकूण सात हफ्ते जमा झाले आहेत. मात्र फेब्रुवारी उलटून गेला तरी देखील अद्याप आठवा हाफ्ता लाभार्थी महिलांना मिळालेला नाही. तसंच जर आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये वाढ करून महिलांना दर महिन्याला २१०० रुपये देऊ अशी घोषणा सत्तेत येण्यापूर्वी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यामुळे आता फेब्रुवारीचा हाफ्ता बँक खात्यात कधी जमा होणार? आणि २१०० रुपये कधीपासून मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे.

महिला दिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत मिळणार डबल गिफ्ट

लाभार्थी महिलांना दिलासा देणारी बातमी आहे, ती म्हणजे येत्या ७ मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार आणि मार्च महिन्याचे दीड हजार असे एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहेत. सरकारकडून या महिन्यात लाभार्थी महिलांना डबल गिफ्ट मिळणार आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स पोस्ट करत माहिती दिली आहे. ‘लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट ! महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. ७ मार्च २०२५ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी ३००० रुपये जमा करण्यात येईल’ अशी पोस्ट आदिती तटकरे यांनी केली आहे.

अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत निर्णय?

महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. या अर्थसंकल्पात जर लाडकी बहीण योजनेसाठी वेगळी आणि विशेष तरतूद करण्यात आली तर लवकरच पात्र महिलांना प्रति महिना २१०० रुपयांचा निधी मिळू शकेल अशी चर्चा आहे.