Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी एक योजना चर्चेत आली होती ती म्हणजे लाडकी बहीण योजना. ही योजना बंद होईल, निवडणुकीपुरती आहे अशी टीका विरोधकांनी केली होती. मात्र ही योजना चालूच राहिली. तसंच या योजनेचा फायदाही सत्ताधाऱ्यांना झाला आहे. दरम्यान महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी किती अपात्र महिलांचे अर्ज आले? पैसे परत घेतले जाणार का? याबाबत आज महत्त्वाची माहिती दिली.
काय म्हणाल्या आदिती तटकरे?
सरकारची कुठलीही योजना असू द्या. विशिष्ट कालावधीनंतर किंवा सालाबादप्रमाणे त्या योजनेची स्क्रुटिनी होत असतेच. संजय गांधी निराधार योजनेतही पात्रता-अपात्रता दरवर्षी तपासली जाते. सिलिंडर सबसिडी योजनेचंही तसंच आहे. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेची पात्रता-अपात्रता तपासली जाणं ही नित्य नियमाने होणाऱ्या प्रक्रियेसारखी आहे. यात काहीही नवीन नाही. योजना नवी असल्याने आणि पहिलंच वर्ष असल्याने त्याबाबत संभ्रम निर्माण केला जातो आहे असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
आम्ही आजवर एकाही महिलेचा लाभ त्यांच्या इच्छेविरोधात काढून घेतलेला नाही-आदिती तटकरे
लाडकी बहीण योजनेला एक वर्षही झालेलं नाही. त्याबद्दलचे काही समज पसरवले जात आहेत. आम्ही आजवर एकाही महिलेचा लाभ त्यांच्या इच्छेविना काढून घेतलेला नाही. ज्यांना सरकारी नोकरी लागली आहे किंवा ज्यांनी सांगितलं की आम्ही शासनाच्या योजनेचा लाभ घेत नाही असं सांगितलं असेल तर हा वेगळा भाग झाला अशाच महिलांचे लाभ परत घेतले गेले आहेत. तसंच स्क्रुटिनीमध्ये लाभ परत घेण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. योजनेचं मूल्यमापन होतच असतं. ही माहिती रोज बदलत असते असं आदिती तटकरे म्हणाल्या.
अनेक लाडक्या बहिणींनी स्वतःहून सांगितलं की…-आदिती तटकरे
आदिती तटकरे म्हणाल्या, “साधारण साडेतीन ते चार हजार अर्ज आले आहेत, ज्या लाडक्या बहिणींनी स्वतःहून हे सांगितलं आहे की आम्हाला या योजनेचा लाभ नको. जे अर्ज आले आहेत ते आम्ही मागवलेले नाहीत. दोन किंवा चार महिन्यांपासून ज्यांनी लाभ घेतला आहे आणि त्यांना कळलं आहे की या योजनेसाठी आपण अपात्र आहोत त्या महिलांनी अर्ज केले आहेत. शासन म्हणून आम्ही एकाही लाभार्थी महिलांच्या लाभाला हात लावलेला नाही. तसंच त्यांच्याकडे संपर्क करुन आम्ही माहिती मागवलेली नाही. सुमारे साडेचार महिला आत्तापर्यंत अशा आहेत ज्यांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ पात्र नसताना घेतला आहे. तसंच त्यांच्याकडून काहीही रिफंड वगैरे घेतलेले नाहीत. आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत. त्याची कारणं जोडलेली आहेत, असं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.
भरत गोगावलेंबाबत काय म्हणाल्या आदिती तटकरे?
माझ्याबाबत एक वक्तव्य भरत गोगावलेंनी केलं आहे त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही काम केलं आहे. आम्ही घटकपक्ष म्हणून आम्ही काम केलं आहे. महायुतीचा उमेदवार निवडून यावा म्हणून आम्ही सगळ्यांनी एकजुटीने काम केलं आहे त्यामुळे महायुतीला २३७ जागा मिळाल्या आहेत. आत्ता त्याचं मूल्यमापन करणं हे योग्य नाही. शासनाचं आणि महायुतीचं नाव खराब होणार नाही ही आपली जबाबदारी आहे असंही आदिती तटकरेंनी म्हटलं आहे. आम्ही आदिती तटकरेंना उगाच निवडून दिलं तसं केलं नसतं तर पालकमंत्रिपदाचा वादच निर्माण झाला नसता असं भरत गोगावले म्हणाले होते. त्याबाबत प्रश्न विचारला असता आदिती तटकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.