Ladki Bahin Yojana Devendra Fadnavis : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला काँग्रेसचा विरोध असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच फडणवीस यांनी म्हटलं आहे की “काँग्रेसचे नेते अनिल वडपल्लीवार यांनी लाडकी बहीण योजना बंद व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे”. फडणवीस यांच्या या आरोपांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे. “अनिल वडपल्लीवार यांचा काँग्रेसशी संबंध नाही”, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. “वडपल्लीवार काँग्रेसचे सदस्य नाहीत”, असंही पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

नाना पटोले म्हणाले, “वडपल्लीवार यांचा काँग्रेस पक्षाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ते आमच्या पक्षाचे सामान्य सदस्य देखील नाहीत. ना नागपूर शहरात, ना ग्रामीण, ना राज्यात, कुठेही त्यांनी काँग्रेसचं सदस्यत्व घेतलेलं नाही. तरी देखील ‘हा काँग्रेसचा खरा चेहरा’ अशा शब्दांत फडणवीस काँग्रेसवर आरोप करत आहेत. मात्र काँग्रेसने अशा प्रकारे विरोध केलेला नाही. मुळात त्यांची (महायुती सरकारची) योजनाच फसवी आहे. लाडक्या बहिणीकडून १०० रुपये घ्यायचे आणि त्यांच्या हातावर पाच रुपये ठेवायचे असा हा प्रकार आहे”.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “राज्यातील महायुती सरकारने आणि केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशभर महागाई वाढवली आहे. त्यामुळे तुमच्या या फसव्या योजनेला लोकप्रियता मिळाल्याचा तुम्ही कितीही दावा केला, कितीही दिखावा केला तरी तुम्ही जनतेच्या पैशातून उधळपट्टी करत आहात हे स्पष्ट दिसतंय आणि आरोप मात्र काँग्रेसवर करत आहात”.

हे ही वाचा >> बदलापूर-कोलकाता प्रकरणांवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; सरन्यायाधीशांसमोर म्हणाले, “जितक्या लवकर…”

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की “काही लोक म्हणतात, आपल्या सरकारने चालू केलेल्या योजना यापुढे चालू ठेवू नका, लाडकी बहीण योजना बंद करावी यासाठी काँग्रेसचे नेते अनिल वडपल्लीवार उच्च न्यायालयात गेले आहेत. ही योजना रद्द केली जावी यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे वडपल्लीवार कोण आहेत माहितीय का? वडपल्लीवार हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस नेते विकास ठाकरे यांचे ते निवडणूक प्रमुख होते. अनिल वडपल्लीवार हे सुनील केदार यांचे राईट हॅन्ड म्हणून ओळखले जातात. वडपल्लीवार यांनी न्यायालयाला सांगितलं की या योजनांवर फार पैसा खर्च होतो. त्यामुळे या योजना बंद करायला हव्या. विरोधक या योजना बंद व्हाव्यात यासाठी विरोधकांनी न्यायालयात धाव घेतली असली तरी मी माझ्या बहिणींना आश्वासन देतो की तुमचा हा देवा भाऊ इथे आहे तोवर उच्च न्यायालयात मोठ्यात मोठा वकील उभा करू, मला या राखीची आण आहे, काहीही झालं तरी या योजनांवर स्थगिती येऊ देणार नाही”.