Ladki Bahin Yojana Next Installment Date : लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? असा प्रश्न राज्यातील लाडक्या बहि‍णींना पडला होता. मात्र, आता लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तसेच जानेवारीचा हप्ता लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये? यासंदर्भातील माहिती आदिती तटकरे यांनी सांगितली आहे. २६ जानेवारीच्या आधी लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा लाभ मिळणार असल्याचं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

“लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता आपण २५ डिसेंबर ते ३० डिसेंबर या दरम्यान वितरीत केला होता. आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता २६ जानेवारीच्या आधी वितरित करण्यात येईल. या संदर्भातील आर्थिक नियोजन आम्हाला अर्थखात्याकडून महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा लाभ देण्यास २६ जानेवारीच्या आधी सुरुवात होईल. त्यानंतर ३ ते ४ दिवसांत या योजनेचे पैसे महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतील”, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं.

“मला सर्व लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की दर महिन्याला आपण महिना संपवायच्या आधी या योजनेचा लाभ देत असतो. आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात २६ जानेवारीच्या आधी करण्यात येणार आहे. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार आम्ही या महिन्याच्या वितरणाला सुरुवात करणार आहोत”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळणार का?

लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळणार की १५०० रुपये मिळणार? असा प्रश्न मंत्री आदिती तटकरे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला असता आदिती तटकरे यांनी सांगितलं की, “याबाबत आम्ही आधीही अनेकदा स्पष्टीकरण दिलेलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्पष्टीकरण दिलेलं आहे. नवीन अर्थसंकल्पात लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याबाबतचा सकारात्मक विचार करण्यात येईल. मात्र, सध्या तरी लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांचा लाभ आपण देणार आहोत”, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladki bahin yojana news aditi tatkare on mukhyamantri mazi ladki bahin yojana january installment in maharashtra gkt