यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरु केली. मात्र, ही योजना आता राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टीप्पणी करत आहेत. या योजनेवरून आज विधानसभेतदेखील गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. यावेळी भाजपाचे आमदार राम कदम आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याच चांगलीच खडाजंगी झाली.
नेमकं काय घडलं?
आज विधानसभेत लक्ष्यवेधी मांडत असताना काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेच्या अंमलजबावणीवरून प्रश्न उपस्थित केला. या योजनेचा अर्ज करण्यासाठी जे अॅप आणि वेबसाईट आहे, ते सतत बंद पडत असल्याने जनतेला त्रास होतो आहे, असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
हेही वाचा – “विधान परिषदेच्या निवडणुकीत आमची चार मतं फुटणार”, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्याने खळबळ; रोख कोणाकडे?
नाना पटोले यांच्या टीकेला राम कदम यांनीही प्रत्यत्तर दिलं. “नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली. मात्र, नाना पटोले यांना वस्तूस्थिती माहिती नाही. माझ्या घाटकोपर मतदारसंघात एका घरात तीन बहिणी आहेत. त्यांना दर महिन्याला साडेसात हजार रुपये मिळणार आहेत. मात्र, काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जाऊन त्यांचा चुकीचं अर्ज भरत आहेत. १५ ऑगस्टला आमच्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जाऊ नये, असा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे”, असा आरोप राम कदम यांनी केला.
पुढे बोलताना, “आज अनेक गोरगरीब महिला लोकांच्या घरी जाऊन भांडी घासतात, त्यांना या योजनेतून दोन पैसे मिळालेले तुम्हाला बघवत नाही. महाविकास आघाडीला केवळ चांगल्या योजनांचे राजकारण करायचे आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्यांना गरीब महिलांना पैसे मिळत असतील तर तुमच्या पोटात काय दुखतं? नाना पटोले यांना या योजनेची माहिती नाही. संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना फसली पाहिजे, असा विरोधकांचा प्रयत्न आहे”, असेही राम कदम म्हणाले.
नाना पटोलेंचे राम कदम यांना प्रत्युत्तर
राम कदम यांच्या आरोपाला नाना पटोले यांनीही प्रत्युत्तर दिलं. “लाडकी बहीण योजनेला आमचा कोणताही विरोध नाही. सरकारने काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, या योजनेचा अर्ज करण्यासाठी जे अॅप आणि वेबसाईट आहे. त्यांचा प्रॉब्लेम सुरु आहे. त्यामुळे तहसीलमध्ये रांगा लागल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होतो आहे. त्यांना जातप्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे मिळत नाही. म्हणून मी लाडली बहीण योजनेच्या अंमलबजावणी वर प्रश्न उपस्थित केला, मात्र, सत्ताधाऱ्यांना याचं केवळ राजकारण करायचं आहे”, असं नाना पटोले म्हणाले.