Premium

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारनं थांबवला, नवे अर्जही स्वीकारणं बंद; नेमकं कारण काय?

आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत.

Ladki Bahin Yojana Suspend
लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारने थांबवला (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Ladki Bahin Yojana Suspend : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी मोठी बातमी आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २ कोटी २० लाखांहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते प्राप्त झाले आहेत. परंतु, निवडणुकीच्या काळात पुढचे हप्ते महिलांना मिळू शकणार नाहीत. कारण, तात्पुरत्या स्वरुपात लाडकी बहीण योजनेला स्थगिती मिळाली आहे. तसंच, या योजनेअंतर्गत नवे अर्ज स्वीकारणंही बंद करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, राज्यात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र पैसे दिले होते. त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा >> Ladki Bahin Yojana Diwali Bonus : लाडक्या बहिणींना खरंच अडीच हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार? नेमका शासन निर्णय काय?

योजनेला स्थगिती, नेमकं कारण काय?

आर्थिक लाभ देऊन मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या योजना त्वरीत थांबवल्या पाहिजेत, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या. तसंच, आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचा आढावाही घेण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सर्व विभागांकडे याबाबतची विचारणा केली. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ दिला जात असल्याचं समोर आलं. त्यामुळे विभागाकडू या योजनेची माहिती मागवण्यात आली आहे. विभागाने या योजनेसाठीचे निधी वितरण चार दिवसांपूर्वीच थांबवल्याची माहिती आयोगाला देण्यात आली. परिणामी निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

२ कोटींहून अधिक महिला पात्र

महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.  तर आतापर्यंत राज्यात २ कोटी २६ लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. जुलै महिन्यापासून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने राबवली आहे. आतापर्यंत पाच हप्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमाही झाले आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे दिल्यानंतर सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र खात्यात जमा केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ladki bahin yojana suspend by government after election commission order sgk

First published on: 19-10-2024 at 12:37 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
Show comments