झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील कलाकारांना नोकरीचं आमिष दाखवून १६ लाखांचा गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे. या मालिकेतील फास्टर राहुल्या आणि स्लोअर राहुल्या या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांची फसवणूक झाल्याचं तीन वर्षांनंतर समोर आले.
फास्टर राहुल्याची भूमिका साकारणारा केशव उर्फ राहुल उत्तम जगताप आणि स्लोअर राहुल्याची भूमिका साकारणारा राहुल संभाजी मगदूम या दोन कलाकारांची फसवणूक झाली आहे. संतोष साहेबराव जामनिक आणि विलास गोवर्धन जाधव अशी फसवणूक करणाऱ्या संशयीत आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तीन वर्षांपूर्वी दोघेही कोल्हापूरला सैन्य भरतीसाठी गेले असता, कृष्णदेव पाटील या व्यक्तीशी त्यांची ओळख झाली. त्या तिघांची नोकरीविषयी चर्चा झाली आणि कृष्णदेवने ओळखीने नोकरी लावून देतो असे सांगितले. त्यानंतर दोघांनीही त्याला प्रत्येकी आठ लाख रुपये दिले. पण तीन वर्षे उलटूनही नोकरी मिळाली नाही. नोकरीविषयी विचारले असता त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोघांनीही पोलिसांकडे तक्रार दाखल केली.