श्री साईबाबा संस्थानने आयोजित केलेल्या श्रीरामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी मंगळवारी लाखो भक्तांनी साईनामाचा गजर करीत साईंच्या समाधीचे दर्शन घेतले.
मंगळवारी पहाटे काकड आरतीनंतर अखंड पारायणाची समाप्ती झाली. साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची द्वारकामाईतून गुरुस्थानमार्गे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश भालचंद्र देबाडवार यांनी पोथी, कार्यकारी अधिकारी अजय मोरे व उपकार्यकारी अधिकारी अप्पासाहेब िशदे यांनी श्रींची प्रतिमा आणि मंदिरप्रमुख रामराव शेळके हे वीणा घेऊन सहभागी झाले होते. द्वारकामाईतील गव्हाच्या पोत्याची, कावडीची व समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा संस्थानचे अध्यक्ष भालचंद्र देबाडवार व सुवर्णा देबाडवार यांच्या हस्ते करण्यात आली. आज सुमारे चार हजारांहून अधिक साईभक्तांनी कावडीद्वारे आणलेल्या पाण्याने साईबाबांच्या समाधीला जलाभिषेक केला.
आज सकाळी वाजता विक्रम नांदेडकर यांचे श्री रामजन्मावर कीर्तन झाले. माध्यान्ह आरतीपूर्वी रासने कुटुंबीय व देशपांडे (निमोणकर) कुटुंबीय यांच्या वतीने नवीन निशाणांची विधिवत पूजा करून ४ वाजता मिरवणूक काढण्यात आली. श्रींच्या रथाची सायंकाळी वाजता गावातून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये साईभक्त मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
उद्या बुधवारी उत्सवाची सागंता होणार आहे. त्यानिमित्त गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक करण्यात येणार असून, सकाळी १० वाजता काल्याचे कीर्तन होऊन दहीहंडीने उत्सवाची सांगता होईल. रात्री ७.३० वाजता कुसुमिता तिवारी व योगेश तिवारी (मुंबई) यांचा ऑर्केस्ट्रा तर रात्री ९.३० वाजता जगदीश पाटील यांची साईभजनसंध्या होईल. गेले दोन दिवस भक्तांच्या गर्दीचा फायदा घेत अनेक चोरटय़ांनी हात साफ केला. मोबाइल, पर्स, पाकिटे आदी वस्तूंच्या चोऱ्या झाल्या. पोलिसांनी मात्र अनेक भक्तांचे गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली. अवैध प्रवासी वाहतूक व खासगी आराम बस यांनीही प्रवासी भाडय़ात वाढ करून भक्तांची लूट केली.