धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा यात्रेसाठी सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्यांचे गुरूवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आगमन झाले. दरम्यान नवरात्रानंतर पाच दिवसांच्या श्रमनिद्रेनंतर बुधवारी उत्तररात्री देवीची निद्रा संपताच देवीच्या मूर्तीची पुन्हा सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. नित्योपचार पूजा, आरती नंतर दिवसभर लाखो भाविकांचे देवीदर्शन आणि रात्री तुळजाभवानी देवीची मानाच्या काठ्यांसमवेत छबिना मिरवणूक पार पडली.
परंपरेनुसार तुळजामातेचे माहेर असलेल्या सिंदफळ येथील मुदगुलेश्वर देवस्थान येथे सोलापूरच्या मानाच्या शिवलाड तेली समाजाच्या काठ्या आणि मानकर्यांचा बुधवारी रात्री मुक्काम झाला. गुरूवारी पहाटे मानकर्यांनी तुळजापूर घाटशीळ मार्गे कोजागिरी पौर्णिमा उत्सवासाठी प्रस्थान केले. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घाळशीळ मार्गे प्रवेश केलेल्या मानाच्या काठ्यांचे समस्त तुळजापूरकरांनी सडा, रांगोळ्या रेखाटून भक्तिमय वातावरणात स्वागत केले. काठ्यांसोबत आलेल्या मानकरी व भक्तांचे भोपे पुजारी सचिन पाटील, संभाजीराव पाटील, प्रशांत पाटील, शिवराज पाटील यांनी स्वागत करून त्यांच्या निवासस्थानी विश्रामासाठी सोय करण्यात आली होती.
कोजागिरी पौर्णिमेला कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी पायी चालत येणार्या लाखो भाविकांचा जत्था सोलापूर ते तुळजापूर या मार्गावर दिसून येत होता. सकाळची नित्योपचार पूजा, आरती झाल्यानंतर दिवसभर लाखो अबालवृद्ध, स्त्री, पुरुष आदी भाविकांनी जगदंबेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पौर्णिमेच्या रात्री जगदंबेच्या छबिन्यात सोलापूर येथून आलेल्या मानाच्या काठ्यांसह मानकरी, भाविक, गोंधळी, आराधी, वासुदेव यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. छत्री, अब्दागिरी, चवर्या दिवटे, पोतांसह निघालेल्या देवीच्या अश्विन पौर्णिमा उत्सवातील छबीना मिरवणूक अवर्णनीय ठरली. हजारो भाविकांनी आपल्या नवस व इच्छापूर्तीसाठी चांदीचा तोडा, पाटल्या, मुकुट देवीचरणी अर्पण करत मनोभावे दर्शन घेतले.
पुण्यातील भाविकांकडून सजावट
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या राजे शहाजी महाद्वारासमोर पुणे येथील भाविक आर. आर. किराड यांच्यावतीने हंस पक्षावर विराजमान तुळजाभवानी देवीचे रूप, तुळजाभवानी देवी मंदिराच्या गाभार्यात फुलांचे मयूर, तसेच यज्ञ मंडपाजवळ रंगीबेरंगी फुलांतून महादेव-पार्वती साकारण्यात आली होती. यासाठी विदेशातून फुलांची मागणी करण्यात आली होती. कोजागिरी पौर्णिमेला देवीचरणी अर्पण केलेल्या या फुलांच्या आरास व सजावटीचे भाविकांतून कौतुक होत आहेत.