घरकुलांचे आमिष दाखवून शहरातील घरेलू महिला कामगारांना लाखो रुपयांना गंडा घातल्याची बाब नुकतीच पुढे आली आहे. शहरातील सुमारे तीन ते चार हजार मोलकरणींकडून प्रत्येकी पाच ते दहा हजार रुपये गोळा केल्यानंतर या योजनेचा सूत्रधार आता गायब झाला असून, शहरातील त्याचा एजंटही या महिलांचे तोंड चुकवत फिरत आहे. त्यामुळेच यात फसवणुकीची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
मुंबई येथील आरजू स्वाभिमान नागरिक समिती (भांडूप) व याच समितीशी संबंधित आरजू क्रिएशन या संस्थेच्या नावाने घरकुलांसाठी लाखो रुपये गोळा करण्यात आले असून या संघटनेचा अध्यक्ष हाच या योजनेचा सूत्रधार आहे. येथील दूरध्वनी क्रमांकही आता बंद आहे. याच नावाने या महिला कामगारांना पैसे भरल्याच्या पावत्या देण्यात आल्या आहेत. पैसे भरल्यानंतर घरे तर दूरच राहिली, आता यातील कोणाचाच थांगपत्ता मिळत नसल्याने या महिला कामगार हवालदिल झाल्या आहेत. यातील अनेकांनी पतीला अंधारात ठेवून ही गुंतवणूक केल्याने त्यांच्या घरातही वेगळेच वाद सुरू झाले आहेत.
चार वर्षांपूर्वी शहरातील या महिला कामगारांना स्वस्त दर व हप्त्यावर घर देण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी साडेतीन हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत पैसे गोळा करण्यात आले. त्यासाठी घरांच्या विविध योजना सादर करण्यात आल्या होत्या. दोन, तीन व चार खोल्यांच्या घरांचे स्वप्न या महिलांना दाखवण्यात आले. त्यासाठी साडेतीन हजार रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत पैसे गोळा करण्यात आले. यातील घरांची किंमत १ लाख रुपयांपासून ४ लाखांपर्यंत होती. त्यासाठी सुरुवातीला ३ हजार ५०० ते १० हजार रुपये नोंदणीचा पहिला हप्ता म्हणून गोळा करण्यात आले. उर्वरित पैशासाठी महिना १ हजार २०० रुपये व आणखी काही हप्ते पाडून देण्यात आले होते. दोन वर्षांत या घरांचा ताबा देण्यात येणार होता. त्याला चार वर्षे झाली असून आता या योजनेचा मुंबईतील सूत्रधार, पैसे गोळा करणारा शहरातील एजंट असे सारेच गायब झाले आहेत. या योजनेसाठी पैसे भरलेल्या शांताबाई सोनवणे, सुभाष सोनवणे, राजू सोनवणे, घोडके यांनी ही माहिती दिली.
वरील संघटनेच्या नावाने स्वस्त घरांचे आमिष दाखवून सन २०११ मध्ये शहरातील मोलकरणींना गळाला लावण्यात आले. घरांसाठी अगदी सुरुवातीला कल्याण रस्त्यावरील जागा दाखवण्यात आली. ही जागा पाहून अनेकांनी सुरुवातीचे पैसे भरले. कालांतराने या जागेवर घरांबाबत कोणतीच प्रगती न दिल्याने काहींनी संबंधितांकडे तगादा सुरू केल्याने नंतर सावेडी येथील एसटीच्या बसस्थानकाजवळील जागा दाखवण्यात आली. त्यावर पुन्हा आणखी महिलांकडून पैसे गोळा करण्यात आले. ही जागाही पुढे बदलण्यात आली. नेप्ती शिवारातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या उपआवाराशेजारील जागेवर घरकुले बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. येथेही गेल्या चार वर्षांत कोणतेच काम झालेले नाही. या योजनेच्या सूत्रधाराने यातील कल्याण रस्त्यावरील महानगरपालिकेच्या हद्दीतील जागेचे (नालेगाव, सव्‍‌र्हे क्रमांक १२२/४, १ हेक्टर ४२ आर) साठेखतही या महिलांना दिले होते. ही जागाही त्याने भावाकडूनच खरेदी केल्याचे दाखवण्यात आले आहे. खरेदीदार या योजनेचा सूत्रधार आणि जागा विकणारा त्याचा भाऊ, अशी ही साठेखताची कागदपत्रे या महिलांना देऊन या जागेवर घरकुल योजना राबवण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या साठेखतावर संघटनेचा अध्यक्ष, सचिवाची नावे, पत्ता, छायचित्रेही आहेत.
या महिलांमध्ये मुख्यत: अशिक्षित महिलांचाच मोठा भरणा असून बहुसंख्य महिलांना लिहिता-वाचताही येत नाही. त्याचाच गैरफायदा घेऊन उद्योग केल्याचे सांगण्यात येते. काही महिलांनी किंवा त्यांच्या पतीने दोन-दोन, तीन-तीन घरांसाठी पैसे भरले आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे अनेकांनी एकापेक्षा अधिक घरांसाठी पैसे जमा केले. आता संबंधितांकडून घरे तर नाहीच, मात्र कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने आपण फसवलो गेल्याची शंका या महिला कामगारांमध्ये निर्माण झाली आहे. संघटितरीत्या त्या पोलिसात रीतसर फिर्याद देण्यासाठी सध्या अशा महिलांची माहिती संकलित केली जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार ही संख्या तीन ते चार हजार असल्याचे सांगण्यात येते. यातील अनेकांकडे आता पैसे भरल्याच्या पावत्याही सापडत नाहीत.
एजंट स्थानिकच
या महिलांकडून सुरुवातीचे पैसे गोळा करणारा एजंट स्थानिक असून तो पूर्वी भूतकरवाडीला राहात होता, असे सांगण्यात आले. येथून तो आता कुटुंबासह गायब झाला आहे. या महिलांना त्याने दोन मोबाइल नंबरही दिले होते. त्यावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, सुरुवातीला त्याने फोन उचलला, मात्र या व्यवहाराचा उल्लेख करताच ‘राँग नंबर’ असे सांगून त्याने हे दोन्ही फोन आता बंद करून ठेवले आहेत. मात्र तो शहरातच असून पोलीस फिर्यादीनंतर त्याला तताडीने अटक झाल्यास या फसवणुकीवर प्रकाश पडेल, असे या महिलांना वाटते.