गेल्या आठवडय़ात राहिलेल्या १७ आणि आजच्या कामकाजातील चार लक्षवेधी अशा २१ लक्षवेधींपैकी दोन लक्षवेधी वगळता एकूण १९ लक्षवेधींच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधण्यात आले. मागच्या आठवडय़ातील गदारोळात लक्षवेधी पुढे ढकलत आज त्यावर प्राधान्याने, सभागृह सुरू होताच विशेषत्वाने चर्चा झाली. त्यातील बहुतेक लक्षवेधी प्रश्नोत्तराच्या तासांना विचारण्यात आल्या.
राज्यातील वस्त्रोद्योगांवर खास करून विदर्भातील वस्त्रोद्योगांवर गंभीर परिणाम होत असल्याचे शोभा फडणवीस यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाच्या लक्षात आणून दिले. ‘अ’ जीवनसत्त्वाचा लहान मुलांना आवश्यक असणारा बुस्टर डोस आणि त्याची रेंगाळलेली खरेदी प्रक्रिया यावरील लक्षवेधी मोहन जोशी यांनी लावून धरली. त्यांनी येरवडा तुरंगातील सुरक्षेच्या अनेक गंभीर त्रुटींवर सभागृहाचे लक्ष वेधले. रामदास कदम यांनी विचारलेल्या गडचिरोली जिल्हा परिषदेमार्फत बांधण्यात येणाऱ्या ११ कोटी सहा लाखांच्या बांधकामाचे तब्बल १७९२ कामांमधील तुकडय़ांचा विषय कदम यांच्या अनुपस्थितीत शोभा फडणवीस यांनी लावून धरला. प्रत्येकी ५० हजारांची कामे कंत्राटदारांना देण्यात आल्याची फडणवीस यांचे म्हणणे होते. मात्र, गृह राज्यमंत्री यांनी प्रश्नोत्तराप्रमाणेच याही ठिकाणी कामांचे तुकडे न झाल्याचे उत्तरात स्पष्ट केले.
कराड तालुक्यातील फलटण येथील ४ महाविद्यालयीन युवतींचे अपहरण करून त्यांना देवीला बळी देण्याचा अपहरणकर्त्यांच्या फसलेल्या प्रयत्नावरील राम पंडागळे यांची लक्षवेधी त्यांच्या अनुपस्थितीत सुभाष चव्हाण यांनी मांडली. चारही युवतींना केलेली बेदम मारहाण आणि इतर समस्यांवर इतरही सदस्यांनी प्रश्न विचारले मात्र, असे काही न झाल्याचे सतेज पाटील यांचे म्हणणे होते. नागरिकांच्या जिव्हाळ्याचा सवलतीच्या दरातील गॅस सिलेंडरची लक्षवेधी संजय दत्त यांनी विचारली त्याला अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुखांनी उत्तरे दिली. याव्यतिरिक्त जयवंतराव जाधव यांची राज्यातील २० जिल्ह्य़ातील सिकलसेलचा प्रादूर्भाव, पांडुरंग फुंडकर यांची बुलढाणा जिल्ह्य़ातील पाण्याची टंचाई, ठाणे जिल्ह्य़ातील विविध प्रकल्पांतर्गत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि किरण पावसकरांची सांगली जिल्ह्य़ातील दुष्काळसदृश्य स्थितीवरील लक्षवेधीही मांडण्यात आली. दिवाकर रावते यांनी तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणारी लक्षवेधी मांडली होती मात्र, मुख्यमंत्री विधानसभेत असल्याने ते परिषदेत उपस्थित राहू न शकल्याने ती पुढे ढकलण्यात आली तसेच नीलम गोऱ्हे यांचीही लक्षवेधी पुढे ढकलण्यात आली. एकूण १९ लक्षवेधींवर आज चर्चा झाली.
विधान परिषदेत लक्षवेधींची जंत्री
गेल्या आठवडय़ात राहिलेल्या १७ आणि आजच्या कामकाजातील चार लक्षवेधी अशा २१ लक्षवेधींपैकी दोन लक्षवेधी वगळता एकूण १९ लक्षवेधींच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधण्यात आले.
First published on: 18-12-2012 at 05:02 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laksahvedhi jantri in parliament