परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. तसेच त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. दरम्यान, या दौऱ्यावरून माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दात टीका केली आहे. ”उद्धव ठाकरे यांना घरात करमत नसल्याने ते शेतकऱ्यांच्या बांधावर येतात”, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

हेही वाचा – “जेव्हा सैनिक कामचुकारपणा करतात, तेव्हा…” सुषमा अंधारेंचा शिंदे गटातील नेत्यांना टोला

नेमकं काय म्हणाले लक्ष्मण ढोबळे?

“मातोश्रीचा उंबरा न ओलांडता देशात एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणून हलगी वाजवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी मोठ्या शिताफीने केले आहे. कोकणातील अनेक घरं वाहून गेली, तेव्हा त्यांनी काडीची मदत केली नाही. पुरामध्ये शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले, तेंव्हा त्यांना आधार दिला नाही. आता निवांत वेळ आहे. सगळी आमदार मातोश्रीवरून निघून गेली आहेत. कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे. बसायला लोक कोणीच येत नाहीत. त्यामुळे त्यांना करमत नसल्याने ते शेतकऱ्यांच्या बांधावर येतात”, अशी खोचक टीका लक्षण ढोबळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

हेही वाचा – “…तर तुम्हाला आश्चर्य वाटेल,” शिंदे गट, भाजपातील पक्षप्रवेशावरून चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे विधान

“एकीकडे शेतकऱ्यांची विचारपूर करण्यासाठी बाधांवर पोहोचलोय म्हणतात, दुसरीकडे १५ ते २० मिनिटांमध्ये दौरा आवरता घेतात. अडीच वर्ष सत्ता असताना एकही चांगलं काम कराव, असं त्यांना वाटलं नाही. आज शिंदे फडणवीस सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत. मात्र, हे त्यांना बघवत नाही”, असेही ते म्हणाले.