Lakshman Hake Wants Cabinet Position : एकीकडे मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा पेच निर्माण झालेला असताना दुसरीकडे ओबीसी आरक्षणासाठी नेतृत्त्व करणाऱ्या लक्ष्मण हाकेंनी थेट शिक्षणमंत्री किंवा महसूल मंत्री बनण्याची इच्छा व्यक्ती केली आहे. मी सत्तेत बसवणारा माणूस आहे, त्यामुळे विधान परिषदेवर माझी बोळवण करू नका, असंही ते म्हणाले. आज ते माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, त्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होऊ लागल्याने त्यांनी नंतर त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

लक्ष्मण हाकेंना आज विधान परिषदेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ओबीसी समाजात त्यांचं नेतृत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्या ओबीसी आंदोलनामुळे महायुतीच्या बाजूने निकाल लागला असल्याची चर्चा ओबीसी समाजात आहे. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या चर्चेबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी विधान परिषदे काय घेऊन बसलात, मला कॅबिनेट पद दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.

हेही वाचा >> President Rule in Maharashtra : विद्यमान विधानसभेचा शेवटचा दिवस, अद्याप सत्तास्थापनेचा मुहूर्त नाही; राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?

“एकनाथ शिंदेंनी १० टक्के आरक्षणाचं आश्वासन दिलं आहे. पण जरांगेंना ते कळलं नाही. ते पवार साहेब, टोपे साहेब, रोहित साहेब करत बसले”, असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. तसंच, कॅबिनेट पदाचीही मागणी केली.

ते म्हणाले, “विधान परिषद काय? अर्ध्या लोकसंख्येचा आवाज असलेल्या माणसाला विधान परिषद काय देताय? कॅबिनेट पद दिलं पाहिजे. शिक्षणमंत्री, महसूलमंत्री पद दिलं पाहिजे. विधान परिषदेवर बोळवण करता काय? अर्ध्या लोकसंख्येचा आवाज आहे हा. मी कोणाकडे भीक मागणार नाही. मी सत्तेत बसवणारा माणूस आहे, विधान परिषद काय घेऊन बसलात? महाराष्ट्रात सत्ता बदलण्याचं काम आम्ही केलंय”, असं लक्ष्मण हाके म्हणाले.

विधान परिषदेवर जायचं असेल तर कोणत्या पक्षातून जाणार?

“मी जर तर ची भाषा बोलत नाही. मी त्यावेळी पत्रकार परिषद घेईन. मला एकनाथ शिंदेंनी चांगली ऑफर दिली तर जाईन”, असं लक्ष्मण हाके म्हणाले.

लक्ष्मण हाकेंनी काय स्पष्टीकरण दिलं?

कॅबिनेट पद आणि विधान परिषदेबद्दल वक्तव्य केल्यानंतर लक्ष्मण हाके यांच्यावर सर्वत्र टीका होऊ लागली. त्यामुळे त्यांनी सोशल मीडिया खात्यावरून या वक्तव्यावरून स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, “मी मंत्री पदाची मागणी केली नाही तसा माझा उद्देश नव्हता, मला विधानपरिषदेबद्दल प्रश्न विचारला तेव्हा उपहासत्मक बोललो, माझ्यासाठी ओबीसीचे प्रश्न महत्वाचे आहेत.”

k

S

Story img Loader