दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्यासाठी आलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय मंत्री अनंतकुमार आदींनी लातूर विमानतळावरून भरदुपारी परळी गाठले खरे; परंतु परळीत त्या वेळी गोंधळ सुरू झाला होता. त्यामुळे हेलिपॅड सोडून प्रत्यक्ष अंत्यविधीच्या ठिकाणी या नेत्यांना जाऊ देण्यास पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव स्पष्ट नकार दिला. अखेर हेलिपॅडवरच आमदार पंकजा पालवे यांची भेट घेऊन ही नेतेमंडळी लातूरमार्गे दिल्लीला परतली.
मुंडे यांच्या अपघाती मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी व कार्यकर्त्यांचा उद्रेक यामुळे संताप अनावर झालेला जमाव कोणाच्या नियंत्रणात येत नव्हता. गोंधळ वाढतच चालल्याचे पाहून पोलिसांनी खबरदारी म्हणून केंद्रीय नेत्यांना हेलिपॅडवरच थांबण्यास सांगितले. दुसरीकडे दिल्लीहून नेत्यांचे आगमन झाले, त्याच्या काही वेळ आधीच अंत्यविधी उरकलाही गेला होता. त्यामुळे आणि गोंधळ नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांनी या नेत्यांना हेलिपॅडवर थांबवले. काही वेळाने आमदार पंकजा पालवे तेथे आल्या. तेथेच त्यांचे केंद्रीय नेत्यांनी सांत्वन केले व काही वेळाने ही नेतेमंडळी लातूरमार्गे दिल्लीकडे रवाना झाली.
मुंडे यांच्या अपघाती मृत्यूची सीबीआय चौकशी केली जावी, अशी संतप्त जमावाची मागणी होती. अंत्यसंस्कार सुरू असतानाच या मागणीसाठी जमावाने मंत्र्यांसह पोलिसांच्या गाडय़ांवर दगडफेक सुरू केली, तसेच मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांच्या गाडय़ांनाही घेराव घातला होता. याच दरम्यान दुपारी भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे व मंत्र्यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले. परळीला ही मंडळी लगोलग पोहोचलीही. मात्र, तोपर्यंत परळीतील आंदोलनाने जोर पकडला होता. त्यामुळे मुंडे यांच्या अंत्यविधीला उपस्थित न राहताच हे नेते दिल्लीला परतले.

Story img Loader