अलिबाग : पोलादपूर तालुक्यातील करंजे गावातील पायटेवाडी येथे जमिनीला भेगा गेल्या आहेत. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. दरम्यान तालुका प्रशासनाने घटनास्थळाची पाहणी केली आहे.
करंजे पायटेवाडी येथील शेतकरी पांडुरंग धोंडू घाडगे यांच्या भातशेताच्या जमिनीत मोठ्या भेगा पडल्याचे समोर आले. त्यामुळे आसपासच्या परिसरात घबराट पसरली. या घटनेची माहिती मिळताच, पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी तातडीने करंजे पायटेवाडी येथे सहकाऱ्यांसमवेत जाऊन पाहणी केली आहे. यावेळी ग्रामस्थांनी काही घरांच्या भिंतींनाही या भेगांमुळे तडे गेल्याचे तहसिलदारांच्या निदर्शनास आणून दिले. पायटेवाडी परिसरातील संभाव्य धोका लक्षात घेऊन येथील जवळपासच्या लोकवस्तीतील नागरिकांना अतिवृष्टीच्या काळात करंजे गावातील शाळेत तसेच समाज मंदिरात स्थलांतरित करण्याच्या सूचना तसेच त्यांच्या राहण्याची जेवणाची व अन्य सुविधा पोहोचविण्याबाबत निर्देश दिले आहेत.
आणखी वाचा-पतीनेच हडप केली पत्नीच्या विमा पॉलिसीची रक्कम
दरम्यान, यापुर्वी २००५ साली पोलादपूर तालुक्यातील बोरावळे गावात तर २०२१ मध्ये वाकण गावामध्येही अशाच रुंद भेगा पडल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या भेगांमुळे पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास भुस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो अशी धास्ती गावकऱ्यांना आहे. त्यामुळे भुवैज्ञानिकांकडून येथील भेगांची पहाणी करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.