इचलकरंजी येथील भूमाफिया गुंड, माजी पाणी पुरवठा सभापती, नगरसेवक संजय तेलनाडे याला रविवारी जिल्हा सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याला न्यायालयात हजर करण्याच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. न्यायालयातील सुनावणीनंतर तेलनाडे याला पोलिसांनी मुख्य मार्गावरून चालवत नेले. पावणेतीन वर्षे फरार असलेल्या तेलनाडेला पाहण्यासाठी रस्त्यावर एकच गर्दी झाली होती.
कोल्हापूरचा फरार कुख्यात भूखंड माफिया संजय तेलनाडेला पुण्यात अटक
मटका, भूमाफिया, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, क्रिकेट बेटींग, सामुहिक बलात्कार, यासह विविध १७ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संजय तेलनाडे व त्याचा भाऊ सुनिल तेलनाडे यांनी एस.टी. सरकार टोळी निर्माण करून दहशत निर्माण केली होती. या टोळीवर दुहेरी मोका अंतर्गत कारवाई झाली आहे. तेलनाडे बंधू वगळता उर्वरीत संशयीतांना पोलिसांनी अटक केलेली आहे. तेलनाडे बंधु पावणेतीन वर्षापासून फरार होते. त्यांच्या शोधार्थ अनेक पथके नियुक्त केली होती. मात्र ते पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर २ जानेवारी पुणे परिसरातील आंबेगावमध्ये पोलिसांना संजय तेलनाडे याला अटक केली. त्याला अटक झाल्याची माहिती समजताच गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कडक पोलीस बंदोबस्त –
आज तेलनाडे याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने गर्दीची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. न्यायालय परिसरात जमलेल्यांना पोलिसांनी पांगविले. प्रचंड पोलीस बंदोबस्तात तेलनाडे याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली. पोलीस गाडी बंद पडल्याचे सांगत सुनावणीनंतर पोलिसांनी तेलनाडे याला न्यायालयापासून मुख्य मार्गावरील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत चालवत नेले. यावेळी काही अतिउत्साही कार्यकर्ते तेलनाडे याचं मोबाईलवर चित्रीकरण करत होते. पोलिसांनी त्यांना बोलावून केलेलं चित्रीकरण डिलीट केले.