पोलादपूरकडून महाबळेश्वरच्या दिशेना जाणाऱ्या आंबेनळी घाटात कालिका माता पॉईंट या ठिकाणी दरड कोसळली आहे. त्यामुळे आंबेनळी घाट वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. प्रवाशांनी ताम्हणी घाटातून जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ही माहिती दिली आहे.
आंबेनळी घाट हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या मार्गावर आहे. हा राज्य महामार्ग क्रमांक ७२ आहे. साधारण ४० किमी लांबीचा हा रस्ता आहे. या घाटाची उंची २ हजार फुटांहून जास्त आहेत.
महाबळेश्वर ते पोलादपूरमध्ये दोन घाट आहेत ‘फिट्झेराल्ड’ हा महाबळेश्वर ते वाडा कुंभरोशीपर्यंत आहे. तर, दुसरा ‘आंबेनळी’ हा कुंभरोशी ते पोलादपूरपर्यंत आहे. जावळीच्या घनदाट अरण्यात हा घाट येतो. या घाटात अपघातांच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. त्यामुळे दरड कोसळल्याचं समजताच दोन्ही बाजूंनी हा घाट वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. प्रवाशांनी ताम्हणी घाटाचा अवलंब करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.