मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात डोंगराच्या कडय़ाचा भाग कोसळला असून त्यामुळे अहमदनगर-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही वाहतूक व्यवस्था खंडाळामार्गे वळविण्यात आली आहे.
माळशेज घाटातील बोगद्याच्या पुढे कल्याण बाजूकडे मोठे धबधबे आहेत. तेथील डोंगराचा मोठा भाग बुधवारी रात्री कोसळला. रस्त्यात भल्या मोठय़ा शिळा पडल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली. या शिळा प्रचंड आकाराच्या असल्याने तेथील रस्तादेखील खचला आहे. याशिवाय गेल्या आठवडय़ापासून मढ, पिंपळगाव जोगे, माळशेज मार्गावर व परिसरात जोरदार पाऊस झाल्याने या मार्गावरील कोळवाडी, पिंपळगाव जोगे फाटा या भागातून जाणाऱ्या महामार्गावरील रस्ताही खचून गेला आहे. रस्त्यावर पाणी वाहून जाण्यासाठी जे मोठे पाइप टाकले होते त्यांचे वरील भरावही वाहून गेले. काही भागांतील रस्ते खचून गेलेले आहेत. त्यामुळे या महामार्गावर आठवडय़ापासून एकेरी वाहतूक सुरू होती. त्यातच दरड कोसळल्याने मध्यरात्रीपासून वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयाकडून गुरुवारी सकाळपासून जे.सी.बी., पोकलेनद्वारे मोठे दगड फोडण्याचे व ते बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. रस्त्याची पूर्णपणे दुरुस्ती झाल्यानंतरच वाहतूक सेवा सुरळीत करण्यात येणार आहे. जी वाहने कल्याणमार्गे माळशेज घाटापर्यंत आली होती त्या वाहनांना माघारी जाऊन खंडाळामार्गे जावे लागले. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. पर्यायी व्यवस्था म्हणून कल्याण-नगर रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक खंडाळा मार्गे वळविण्यात आली आहे, अशी माहिती ओतूर बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक नामदेव गवारी यांनी दिली.

Story img Loader