रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. तसेच परिसरात अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफची दोन पथकं बचावकार्यासाठी इर्शाळवाडीत दाखल झाली आहेत. या बचाव पथकांचं शोधकार्य सुरू आहे. तसेच मुंबईहून आणि पनवेलहूनही तीन बचाव पथकं इर्शाळवाडीत दाखल झाली आहेत. लोकांच्या मदतीसाठी पोलिसांनी नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
उद्योगमंत्री उदय सामंत आणि बंदरविकास मंत्री दादा भुसे घटनेची पाहणी करण्यासाठी इर्शाळवाडीत दाखल झाले आहेत. दरम्यान, बचाव पथकांनी आतापर्यंत २२ जणांची सुखरूप सुटका केली आहे. अजूनही अनेक लोक अडकल्याची भीती आहे. सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे १०० हून अधिक अधिकारी-कर्मचारी बचाव कार्यात गुंतले असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली. यासह बचावकार्यात एनडीआरएफ, स्थानिक आणि काही स्वयंसेवी संस्थांकडून मदत मिळत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
इर्शाळवाडी हे एक छोटंसं गाव असून त्या गावात ५० ते ६० घरांची वस्ती आहे. पावसामुळे इर्शाळगड खडकाचा काही भाग कोसळला असून त्यात अनेक गावकरी माती-खडकांच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना काल (बुधवार, १९ जुलै) रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यान घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचण येत आहे : उदय सामंत
या घटनेची माहिती देताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, रात्री ११ च्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली आहे. डोंगराळ भागात अजूनही भूस्खलन होतंय. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचण निर्माण होत आहे. एनडीआरएफची बचाव पथकं दाखल झाली आहेत. आतापर्यंत या बचाव पथकांनी २५ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींना नवी मुंबईतील रुग्णालयात नेलं आहे.