सावंतवाडी : तिलारी जलसंपदा विभाग यांच्या ताब्यात असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी केर नदी पाञात जलवाहिनी पाईप लाईन कोसळून पाणी पुरवठा बंद झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी तिलारी धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याला साटेली भेडशी भोमवाडी येथे भले मोठे भगदाड पडून कालवा फुटल्याने एकच हाहाकार उडाला.

सप्टेंबर महिन्यात दुरूस्ती केलेल्या ठिकाणी भरावाच्या खाली असलेल्या मोरीच्या पाईप मध्ये पोकळी निर्माण होऊन माती भराव खचून पाणी बाहेर पडून भगदाड पडले. कालवा फुटून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडून कुडासे वानोशी साटेली भेडशी रस्ता बंद झाला. शेती बागायती घरात पाणी शिरले पावसाळ्यात पूरजन्य परस्थिती निर्माण होते. तसे पाणी वाहत होते. संतापलेल्या नागरीकांनी अधिकारी वर्गाला धारेवर धरले. कालवा फुटल्याने गोवा राज्यातील डिचोली तालुक्यात तसेच जल शुध्दीकरण प्रकल्पालावर याचा परिणाम होणार आहे. कालवा फुटल्याने उन्हाळी बागायती शेती घेणारे शेतकरी संकटात सापडले आहेत.

महाराष्ट्र गोवा राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याची कामे गोवा राज्याच्या धर्तीवर झाली असती किंवा कामाचा दर्जा योग्य प्रकारे राखला गेला असता तर अशा घटना थांबल्या असत्या. पण राज्य सरकार संबंधित मंत्री यांचे दूर्लक्ष, निकृष्ट कामे यामुळे याचे गंभीर परिणाम बागायतदार शेतकरी बांधवाना भोगावे लागत आहेत.

साटेली भेडशी भोमवाडी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून माती भराव टाकून केलेल्या कालव्यात मोठ्या प्रमाणात गळती आहे. शिवाय कालवे बांधून जवळपास चाळीस वर्षे झाली. कालवा लाईफ संपले तरी हे कालवे पक्का स्वरूपात किंवा पुन्हा योग्य प्रकारे दूरुस्तीवर लक्ष दिले गेले नाही. देखभाल दुरुस्ती केवळ कागदोपत्री प्रत्यक्षात काही नाही हे चित्र तिलारी धरणाच्या डाव्या उजव्या तसेच इतर कामात बघायला मिळते.

साटेली भेडशी भोमवाडी येथे धरणाच्या डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाणी नाल्यातून साटेली भेडशी भोमवाडी कुडासे वानोशी रस्त्यावर आले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले यामुळे वाहतूक बंद झाली शाळकरी मुले अडकून पडली. काही वाहने अडकली तर काही जणांनी पाण्यातून मार्ग काढत वाहने काढली. सुतार यांच्या घरात पाणी शिरले तर काही जणांचे शेतातील पाईप वाहुन गेले.

Story img Loader