कुंभमेळ्यासाठी सज्ज होणाऱ्या त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरीच्या पायथ्यासह शेजारील नील पर्वतावर काही आखाडय़ांनी खोदकाम करून रस्ता, मंदिरे, इमारत व सभागृहांचे काम सुरू केले असून या कामांमुळे ऐन सिंहस्थात या नगरीचे भवितव्य धोक्यात आले आहे. या कामांसाठी डोंगर पोखरण्यासोबत परवानगी न घेता मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. लाखो भाविकांचा सहभाग असणाऱ्या कुंभमेळ्यात हे उद्योग नैसर्गिक आपत्तींना निमंत्रण देणारे ठरू शकण्याची भीती व्यक्त होत आहे. डोंगर व पायथ्याशी   पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असल्याकडे यंत्रणांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान, महसूल विभागाने संबंधितांना नोटीस बजावत सावधगिरीचे उपाय योजण्याचे सूचित केले.
पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. सह्य़ाद्रीच्या कुशीत वसलेल्या त्र्यंबकमध्ये गोदावरीचे उगमस्थान असणारा ब्रह्मगिरी आणि समोरील बाजूस नील पर्वत आहेत. ब्रह्मगिरी पर्वतावर व पायथ्याशी काही आखाडय़ांच्या जागा आहेत. नील पर्वत पंचदशनाम जुना आखाडय़ाच्या मालकीचा आहे. सिंहस्थात येणाऱ्या साधू व भाविकांना सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने या आखाडय़ाने पर्वतावर निवारागृह, सभागृह व मंदिरांचे काम सुरू केले आहे. त्यासाठी उत्खनन, सपाटीकरण केले गेले. अतिशय धोकादायक ठिकाणी ही कामे सुरू आहेत. शेतजमीन असणाऱ्या या क्षेत्रावर बांधकामास परवानगी नाही. नगरपालिकेकडे विचारणा केली असता बिनशेती क्षेत्र झाल्याशिवाय बांधकामांना परवानगी देता येत नसल्याचे सांगण्यात आले. म्हणजे नील पर्वतावर चाललेली कामे अनधिकृत असल्याचे अधोरेखित होत आहे. या पर्वताच्या पायथ्याशी अन्नपूर्णा आश्रमाने मंदिरालगत उत्खनन केले. तशीच काहीशी स्थिती ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. अनेक आखाडय़ांनी सिंहस्थानिमित्त निवारागृहांची कामे केली असून त्यासाठी आपल्या जागेवरील वृक्षांची तोड केली आहे; तथापि त्यासाठी संबंधित यंत्रणेकडून परवानगी घेतलेली नाही.

Story img Loader