कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या पात्रात वाळूमाफियांवर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता महसूल विभागाने गणेशवाडी परिसरात मोठी कारवाई केली. या पथकाने तब्बल ९ फायबर बोटी स्फोट करून उडवून दिल्या. या कारवाईमुळे वाळूमाफियांवर दहशत बसू शकते. या कारवाईत वाळूमाफियांचा सुमारे १ कोटी रुपयांपेक्षा जादा हानी झाली आहे.
प्रभारी प्रांताधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक चव्हाण, कामगार तलाठी बंडू कारंडे, जब्बार शेख यांच्यासह पोलीस कर्मचारी गोसावी, भापकर, डी. बी. जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
तालुक्यातील गणेशवाडी परिसरात काल भीमा नदीच्या पात्रात सरकारी बोट घेऊन स्वत: लक्ष्मीनारायण मिश्रा हे पथक घेऊन शिरले. त्यांनी वाळूचोरी करीत असलेल्या ९ फायबर बोटी पकडल्या. काही बोटी मात्र माफियांनी पळवून नेल्या. पकडलेल्या ९ बोटी या पथकाने लगेचच स्फोट करून फोडल्या, त्यामुळे त्यांना जलसमाधी मिळाली. काही वाहून गेल्या आहेत. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. या एका बोटीची किंमत सुमारे १० लाख रुपये असून त्यानुसार या माफियांचे सुमारे ९० लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले.
तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात खेडपासून सिद्धटेकपर्यंत सर्व ठिकाणी दररोज राजरोस हजारो ब्रास वाळूची चोरी सुरू आहे. यामध्ये बाभूळगाव, शिंपोरा, खेड, खेडजवळील मोठा पूल, गणेशवाडी, जलालपूर, सिद्धटेक, भांबोरा, बेर्डी, महादेवनगर, शिवशंभोनगर, सिद्धटेक यासह अनेक गावांचा समावेश आहे. या वाळूमाफियांनी आत्तापर्यंत कोटय़वधी रुपयांची वाळू चोरली आहे. वाळूमाफियांच्या दहशतीमुळे शेतकरी तक्रार करण्यास धजावत नाहीत. या वाळूचोरीत अनेक राजकीय नेत्यांचा थेट सहभाग असल्याचे पुरावे मिळत आहेत. वाळूचोरीला राजाश्रय मिळाल्यामुळे कारवाई होत नाही, मात्र परीविक्षाधीन प्रांताधिकारी मिश्रा यांच्या या कारवाईची जरब बसेल अशी अपेक्षा आता व्यक्त होऊ लागली आहे.

Story img Loader