मराठवाडय़ात सर्वाधिक सुपीक जमीन असलेल्या परभणी जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काळ्या कसदार जमिनीपासून ते मराठवाडा कृषी विद्यापीठापर्यंत सर्व साधने असलेल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा कणा मोडून पडला असून जिल्ह्यात दहा वर्षांत ३३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात सात महिलांचाही समावेश आहे. गेल्या दीड वर्षांत जिल्ह्यात १११ आत्महत्या झाल्या आहेत.
सुरुवातीला शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या विदर्भातूनच येत असत. कालांतराने मराठवाडय़ातही अधूनमधून अशा घटना घडत होत्या. गेल्या दहा वर्षांंपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडू लागल्या आहेत. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा ही प्रमुख कारणे या आत्महत्येच्या बुडाशी आहेत. गेल्या दहा वर्षांची आकडेवारी पाहू जाता जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना २०१४ या वर्षांत सर्वाधिक घडल्याचे दिसून येते. २०१४ या वर्षांत ७० आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत.
परभणी जिल्ह्यात या वर्षी ऑगस्टअखेपर्यंत ४१ शेतकऱ्यांनी गळफास किंवा विष प्राशन करून मरणाला जवळ केले. सततची नापिकी, सावकार किंवा बँकेचे कर्ज त्यामुळे आíथक ताणाताणीत कुटुंबातील स्वास्थ्य बिघडून काही शेतकऱ्यांनी स्वतला गळफास लावून जीवन संपविले. परभणी जिल्ह्यात २००६ ते ३१ ऑगस्ट २०१५ पर्यंत ३३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. वर्ष आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे आकडे पुढीलप्रमाणे आहेत. २००६(५२), २००७(२८), २००८(१८), २००९(२३), २०१०(२०), २०११(२५), २०१२(३५), २०१३(२३), २०१४(७०) असे चिंता वाढविणारे आकडे आहेत. या वर्षांतल्या आठ महिन्यात शेतकरी आत्महत्येच्या ४१ घटना घडल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यात ३३५ आत्महत्येच्या घटना घडल्या असल्या तरीही यात २३८ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली, तर ९५ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. जिल्ह्यात शेती क्षेत्रात सध्या अवकळा आल्याचेच चित्र असून या वर्षी पावसाने ताण दिल्याने सलग तिसऱ्या वर्षी शेतकरी आíथक अरिष्ठातून जात आहे.
मराठवाडय़ात सर्वाधिक काळी कसदार जमीन परभणी जिल्ह्याची आहे. कागदावर का होईना पण जिल्ह्याला सिंचन क्षेत्रही लाभले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सावरण्यासाठी काही साधने हाताशी असतानाही नसíगक अवकृपेमुळे पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठय़ावर आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकी यामुळे या घटना घडू लागल्या आहेत. शेतकरी आत्महत्येच्या घटनांचे वाढते आकडे ही जिल्ह्याच्या दृष्टीने सर्वाधिक चिंतेची बाब झाली आहे.

Story img Loader