विधानपरिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य आनंदराव राघोजीराव पाटील यांचे काल रविवारी रात्री कराडमध्ये आगमन झाले. यानंतर समर्थक कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांची ओपन जीपमधून मिरवणूक काढली. मिरवणुकीत तरूण कार्यकर्ते दुचाकीवरून सहभागी झाले होते. तर, गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीसह जयघोषाने आनंदराव पाटलांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे घरच्या मैदानावरील कारभारी म्हणून विशेष ओळख असलेल्या आनंदराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या येथील निवासस्थानी भेट देऊन माजी केंद्रीयमंत्री आनंदराव चव्हाण व माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्षा प्रेमलाकाकी चव्हाण या मुख्यमंत्र्यांच्या दिवंगत मातापित्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी प्रीतिसंगमावर जाऊन लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण केले. शहरातील युगपुरूषांच्या पुतळय़ांना आनंदरावांनी पुष्पहार वाहिले.
विधानसभेच्या १९९५ व १९९९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर अनुक्रमे ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील व त्यांचे पुत्र बाळासाहेब पाटील यांच्याशी आनंदराव पाटलांनी लढत दिली. मात्र, त्यांना पराभवास सामोरे जावे लागले होते. यानंतर पृथ्वीराज चव्हाण गेली १० वष्रे केंद्रात व राज्यात प्रतिष्ठेच्या पदावर मंत्री राहिल्याने विधानपरिषदेच्या सदस्य निवडी दरम्यान, आनंदरावांचे नाव कायमच चर्चेत राहिले. अखेर राज्यपाल नियुक्त सदस्यपदी त्यांची वर्णी लागली. या निवडीसंदर्भात बोलताना, आनंदराव पाटलांनी मुख्यमंत्री चव्हाण व त्यांच्या मातोश्री प्रेमलाकाकी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पक्ष बळकटीसाठी कंबर कसून काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
आनंदरावांना अखेर आमदारकीची संधी
विधानपरिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य आनंदराव राघोजीराव पाटील यांचे काल रविवारी रात्री कराडमध्ये आगमन झाले. यानंतर समर्थक कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांची ओपन जीपमधून मिरवणूक काढली.
First published on: 10-06-2014 at 03:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Last chance to anandrao for mla