विधानसभा निवडणुकीत आघाडीतील घटक पक्षांनी एकमेकांच्या खोडय़ा काढल्या तर आत बसण्याची वेळ येईल, असा इशारा वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी पत्रकार बठकीमध्ये दिला. दोन्ही काँग्रेसची युती अटळ असल्याचे सांगणाऱ्या डॉ. कदम यांनी विधानसभेची आपण शेवटची निवडणूक लढवित असल्याचे जाहीर केले.
    सांगली जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कदम म्हणाले की, दोन्ही काँग्रेस समर्थपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे जातील. आघाडीच्या जागा वाटपाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेणार असून संसदीय मंडळाच्या बठकीत यावर शिक्कामोर्तब केले जाईल. राज्यात पुन्हा एकदा आघाडीचीच सत्ता येणार आहे.
    जिल्ह्यात काँग्रेसची जागा असणाऱ्या मतदारसंघातच राष्ट्रवादीचे आउटगोईंग सुरू आहे याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, याचा फारसा परिणाम होणार नाही. गेली १५ वष्रे दोन्ही पक्ष एकत्र आहेत. अशा अडचणीच्या काळात राष्ट्रवादीला मदत करण्याचीच काँग्रेसची भूमिका राहील. आघाडीत एकमेकांना मदत करावीच लागेल अन्यथा कोणी खोडय़ा करण्याचा प्रयत्न केला आणि सत्ता गेली तर केलेल्या कर्माची फळे म्हणून काहींवर आत बसण्याची वेळ येईल.
    आपल्या मतदारसंघात विरोधक राष्ट्रवादीचे असून त्यांना कायम संरक्षण देण्याचे काम त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी केले. प्रसंगी त्यांच्या कृष्णकृत्यावर पांढरे कापड टाकून झाकण्याचेही काम केले गेले. जिल्ह्यात काँग्रेसला चार आणि राष्ट्रवादीला दोन जागांवर विजय मिळू शकतो. जतची जागा काँग्रेसचीच असून ती पुन्हा मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून तेथेही काँग्रेसला यश मिळेल.
    सध्या केंद्रात मोदींची सत्ता आहे, राज्यपालांकडून थेट सचिवांकडे आढावा घेतला जात असून हे अयोग्य असल्याचे मत कदम यांनी व्यक्त केले. विरोधकांच्या कांगावखोर वृत्तीमुळेच आपण निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. ही आपली शेवटची निवडणूक असून यापुढे आपण पलूस-कडेगावमधून निवडणूक लढविणार नाही, असेही डॉ. कदम यांनी स्पष्ट केले.
    एकमेकांवर कुरघोडय़ा केल्या तर सर्वाना घरीच बसावे लागणार असले तरी काही जणांना आत जावे लागणार आहे. आपणाला मात्र अन्य क्षेत्रात काम करण्याची मुबलक संधी उपलब्ध असून सत्तेशिवाय काम करण्यास अडचण येणार नाही.
    सवती मत्सर मुळावर
आघाडीबाबत बोलताना डॉ. कदम यांनी दोघ्या सवतींची कथा सांगितली. दुसरीला विधवा करण्यासाठी एका सवतीने नवऱ्याच्या डोक्यात पाटा घातला. नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर सवती सोबत तीही विधवा झाली. तशी अवस्था एकमेकांच्या खोडय़ा काढीत बसलो तर होईल असे त्यांनी सुचविले.

Story img Loader