काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्यासह तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहेत. दीर्घकाळ विविध खात्यांचे मंत्री, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षपद भूषविलेल्या सोळंके यांचा राजकीय वारसा राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रकाश सोळंके चालवत आहेत.
माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव निवासस्थानी बुधवार रात्री नऊच्या सुमारास सुंदरराव सोळंके यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते पाठीच्या आजाराने त्रस्त होते. बीड जिल्हय़ातील मोहखेड (माजलगाव) येथे शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या सुंदरराव आबासाहेब सोळंके यांनी कायद्याची पदवी मिळवल्यानंतर केज येथे वकिली व्यवसाय सुरू केला. याच काळात १९६२मध्ये जि.प. लोकल बोर्डाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. १९६७मध्ये केजमधून पहिल्यांदा आमदार व मंत्रीही झाले. गेवराईतून बिनविरोध निवड झाल्यानंतर १९८०मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. या काळात त्यांच्याकडे विविध खात्यांची मंत्रिपदे होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांचा गोिवदराव डक यांनी अवघ्या ३ हजारांच्या फरकाने पराभव केल्यानंतर सोळंके यांनी पुन्हा कधीच निवडणूक लढवली नाही.
माजलगाव मतदारसंघात माजलगावचे जायकवाडी धरण, तेलगाव येथे माजलगाव सहकारी साखर कारखाना व उपळी येथील कुंडलिका प्रकल्प अशी मोठी विकासाची कामे त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून उभी राहिली. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संस्थापक सदस्य व तब्बल २७ वष्रे अध्यक्ष होते. जिल्हय़ात सर्वत्र मंडळाच्या शाळा-महाविद्यालये त्यांनी सुरू केली. मंत्री व मंडळाचे अध्यक्ष असताना एकही पसा न घेता अनेकांना नोकऱ्या दिल्या. त्यामुळे मोफत नोकरी देणारे साहेब म्हणून त्यांचा परिचय होता. विचाराशी बांधील, साधी राहणी, विकासात्मक दृष्टी त्यांनी जोपासली. अनुभवी नेत्याला मुकल्याची भावना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी, तर जुन्या पिढीतील अभ्यासू नेतृत्व हरपल्याची भावना आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
दोन माजी उपमुख्यमंत्र्यांचे निधन
सुंदरराव सोळंके यांनी जि.प. सदस्य ते उपमुख्यमंत्रिपदापर्यंत स्वकर्तृत्वाने स्थान मिळवले. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीही जि.प. सदस्य ते उपमुख्यमंत्री व पुढे केंद्रीय ग्रामविकासमंत्रिपदापर्यंत वाटचाल केली. मात्र, दोन्ही नेत्यांचे सहा महिन्यांच्या फरकाने निधन झाले. ३ जूनला मुंडे यांचे अपघातात, तर ५ नोव्हेंबरला सोळंके यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. अशा प्रकारे जिल्हय़ातील दोन्ही माजी उपमुख्यमंत्री काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा