अहिल्यानगर : जिल्ह्यात महावितरणकडून ग्राहकांना दिल्या गेलेल्या वीज देयकासंदर्भात गेल्या वर्षभरात ७४ हजार २७० तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींमध्ये ५१ हजार ५८० ग्राहकांच्या देयकांमध्ये महावितरणला दुरुस्ती करुन देणे भाग पडले आहे. म्हणजे ६९ टक्के ग्राहकांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले आहे तर १८ हजार ७२२ तक्रारी तथ्य नसल्याचे आढळले आहे. हे प्रमाण केवळ ३१ टक्के आहे.
महावितरणकडून माहिती उपलब्ध झाली आहे. ही आकडेवारी १ एप्रिल २०२४ ते २५ फेब्रुवारी २०२५ अशा अकरा महिन्यांच्या कालावधीतील आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी महावितरणच्या जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीतही हीच आकडेवारी सादर केली होती. म्हणजे महावितरणकडून ग्राहकांना चुकीची वीज देयके देण्याचे प्रमाण अधिक आहे.महावितरणकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार ग्राहकांच्या वीज देयकासंदर्भात मीटर रिडींग न घेताच देयके देणे, मीटर नादुरुस्त आहे, विज नसतानाही देयके दिली अशा स्वरूपाच्या सर्वसाधारण तक्रारी प्राप्त होतात. मिटर वाचन करुन देयके घरोघर वितरित करण्याचे काम महावितरणकडून जिल्ह्यात २० संस्थांना दिलेले आहे. जिल्ह्यात महावितरणचे विविध प्रकारचे एकूण ८ लाख ४ हजार ग्राहक आहेत. त्यामध्ये घरगुती ६ लाख ८९ हजार, वाणिज्य वापराचे ८० हजार, औद्योगिक वापराचे १७ हजार, पथदिव्यांची ४ हजार २३ तर इतर स्वरूपाचे १३ हजार ग्राहक आहेत.
सुमारे वर्षभरात प्राप्त झालेल्या २३४ वगळता सर्वच तक्रारींचे महावितरणकडून निराकरण करण्यात आलेले आहे. प्राप्त ७४ हजार २७० तक्रारींमध्ये केवळ १५५६ तक्रारींमध्ये मीटर वाचननुसारच वीज देयक दिले गेलेले आढळले. १८ हजार ७२२ तक्रारींमध्ये वीज देयक योग्य असल्याचे आढळले, ५१ हजार ५८० तक्रारींमध्ये वीज देयकात सुधारणा करावी लागली. २४१२ तक्रारी वीज देयक मिळालेच नाही किंवा उशिरा मिळाल्याच्या तक्रारी आहेत.
मिटर वाचनासाठी कर्मचारी आल्यानंतर घराला, सदनिकेला कुलूप असणे, बंद बंगल्याच्या कुंपणामुळे मीटर वाचनासाठी आत न जाता येणे, त्यामुळे सरासरी विज देयक दिले जाते. मीटर वाचन किती आहे याचे छायाचित्र महावितरणकडून ग्राहकाच्या व्हाट्सअपवर पाठवले जाते, मात्र अनेकदा ग्राहक त्याकडे दुर्लक्ष करतात.
वीजजोड दिले मात्र देयकच नाही
महावितरणला प्राप्त झालेल्या ७४ हजार २७० तक्रारींमध्ये सरासरी वीज देयक असल्याच्या ३५२४, अधिक रकमेचे देयक मिळाल्याच्या ५६ हजार ७५६, उशिरा देयक पावती मिळाल्याच्या ५८६, देयक कमी रकमेचे मिळाल्याच्या ८५०, मीटर वाचन दुरुस्तीच्या २३५०, मीटर वाचन केलेच नाही अशा १५७८, देयकाची पावती न मिळण्याच्या १७३८, वीजजोड असूनही देयक न मिळालेले ९० ग्राहक आढळले तर चुकीचे वीज देयक मिळाल्याचे ६८९८ तक्रारी प्राप्त झाल्या.
वीज देयक ऑनलाइन प्रमाण वाढले
महावितरणची देयके ऑनलाइन पद्धतीने भरण्याचे प्रमाण ८० टक्के आहे. त्याची पावती ऑनलाइन पद्धतीने मिळते. तरीही पावती न मिळाल्याच्या, उशिरा पावती मिळाल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. मीटर वाचन, देयकाची रक्कम महावितरणकडून ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवले जाते. मात्र त्यात अनियमित असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.